१.१६ लाख नागरिकांनी केली स्व-गणना
ठाणे : केंद्र शासनाच्या ‘जनगणना २०२७’ मोहिमेअंतर्गत ठाणे जिल्ह्यात घर यादी व घरगणना (House Listing & Housing Census) या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरू असून, स्व-गणना सुविधेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील तब्बल १ लाख १६ हजार ५१२ नागरिकांनी डिजिटल स्व-गणनेचा लाभ घेत आपली माहिती स्वतः नोंदविली आहे.
जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ९ चार्ज क्षेत्रांमध्ये हे काम सुरू आहे. यामध्ये भिवंडी, कल्याण, शहापूर, मुरबाड व अंबरनाथ हे ग्रामीण चार्ज तसेच कुळगाव-बदलापूर आणि अंबरनाथ नगर परिषदांसह शहापूर व मुरबाड नगर पंचायतींचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यातील कामासाठी जिल्ह्यात ३,९२२ हाऊस लिस्टिंग ब्लॉक्स निश्चित करण्यात आले असून ४,८१६ जनगणना कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये ४,१२५ प्रगणक आणि ६९१ पर्यवेक्षक कार्यरत आहेत. चार्जनिहाय आकडेवारीनुसार भिवंडी ग्रामीण भागात सर्वाधिक ९३२ ब्लॉक्स असून तेथे १,०९४ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कुळगाव-बदलापूर नगर परिषद क्षेत्रात ७०२ ब्लॉक्ससाठी ९०० कर्मचारी, तर अंबरनाथ नगर परिषद क्षेत्रात ६९८ ब्लॉक्ससाठी ८४४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
शहापूर ग्रामीण भागात ५८६ ब्लॉक्ससाठी ७१४ कर्मचारी, कल्याण ग्रामीण भागात ४१३ ब्लॉक्ससाठी ५१५ कर्मचारी, मुरबाड ग्रामीण भागात २८२ ब्लॉक्ससाठी ३६० कर्मचारी आणि अंबरनाथ ग्रामीण भागात २२८ ब्लॉक्ससाठी २८३ कर्मचारी कार्यरत आहेत. शहापूर नगर पंचायत क्षेत्रात ४३ ब्लॉक्ससाठी ५६ कर्मचारी, तर मुरबाड नगर पंचायत क्षेत्रात ३८ ब्लॉक्ससाठी ५० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
दरम्यान, जनगणनेचा दुसरा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे लोकसंख्या गणना हा १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आपल्या दारी येणाऱ्या प्रगणकांना अचूक माहिती देऊन या राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे.
चौकट :
ठाण्यातील जनगणना २०२७ एका नजरेत
स्व-गणना करणारे नागरिक : १,१६,५१२
एकूण चार्ज : ९
हाऊस लिस्टिंग ब्लॉक्स : ३,९२२
एकूण कर्मचारी : ४,८१६
प्रगणक : ४,१२५
पर्यवेक्षक : ६९१
लोकसंख्या गणना कालावधी : १ ते २८ फेब्रुवारी २०२७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *