००००००००
मुंबई : स्वातंत्र्यसैनिक, माजी खासदार, मुंबईचे माजी महापौर आणि ज्येष्ठ कामगार नेते डॉ. शांती पटेल यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त गोदी कामगारांच्या वतीने शनिवारी (१३ जून) माझगाव येथील कामगार सदनमध्ये अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने सकाळी ११ वाजता ऑरेंज गेटजवळील वाडीबंदर येथील डॉ. शांती पटेल चौकातील नामफलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कामगार सदनमधील युनियन कार्यालयात डॉ. पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
स्मृतिदिनानिमित्त आयोजित सभेत युनियनचे अध्यक्ष ॲड. एस. के. शेट्ये, जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, कार्याध्यक्ष डॉ. यतीन पटेल, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड सदस्य प्रदीप नलावडे, सेक्रेटरी विद्याधर राणे, दत्ता खेसे, विजय रणदिवे, खजिनदार विकास नलावडे, उपाध्यक्ष विष्णू पोळ, ‘पोर्ट ट्रस्ट कामगार’ अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, संघटक चिटणीस मीर निसार युनूस, संदीप चेरफळे, तसेच सतीश घाडी आणि गुरुदत्त वाळंज आदी मान्यवरांनी डॉ. शांती पटेल यांच्या सामाजिक, राजकीय आणि कामगार चळवळीतील उल्लेखनीय योगदानाच्या आठवणींना उजाळा दिला.
वक्त्यांनी डॉ. शांती पटेल यांनी कामगारांच्या हक्कांसाठी दिलेला लढा, सार्वजनिक जीवनातील त्यांचे योगदान आणि समाजहितासाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. या कार्यक्रमास गोदी कामगार, कार्यकर्ते आणि युनियन पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *