– किशन जावळे व संदेश शिर्के यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता
रायगड-अलिबाग : (अशोक गायकवाड )—-जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासमवेत कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची प्रलंबित मागण्या आणि कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत एक अत्यंत महत्त्वाची बैठक गुरुवारी, दि.११ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी जावळे आणि निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. विशेष म्हणजे, जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक अडचणींवर बैठकीदरम्यानच थेट फोन लावून तात्काळ निकाल काढला व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला. या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रामुख्याने सरळ सेवा भरतीतील अनुशेष भरणे, अनुकंपा भरती प्रक्रियेला गती देणे आणि अधिसंख्य पदांच्या सद्य:स्थितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच आश्वासित प्रगती योजना लागू करणे, प्रलंबित वैद्यकीय बिले मंजूर करणे, निलंबन व पेन्शन प्रकरणांचा जलद निपटारा करणे या आर्थिक व प्रशासकीय लाभांच्या मागण्यांवर भर देण्यात आला. यासोबतच तीन वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचे संकलन बदल करणे, सेवा वर्ग करणे आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल वेळेत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ३ डिसेंबर १९८० च्या शासन निर्णयानुसार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना प्रशासनात महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी देण्याबाबत आणि पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना महसूल विभागात काम करताना येणाऱ्या प्रशासकीय अडचणींवर मार्ग काढण्यावर यावेळी विचारविनिमय झाला. याव्यतिरिक्त, दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना आधार कार्ड मिळवून देण्यासाठी विशेष उपाययोजना आखण्याचा सामाजिक उपक्रमही या बैठकीत निश्चित करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनेला आश्वस्त करताना सांगितले की, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या सर्व मागण्यांबाबत प्रशासन पूर्णपणे सकारात्मक असून, कर्मचाऱ्यांचा कोणताही प्रश्न प्रलंबित राहणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. या बैठकीला कास्ट्राईब कर्मचारी महासंघ व संघटनेचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्याचे महासचिव सुरेश तांबे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुईगळ, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष राजेश सदावर्ते, रायगड जिल्हाध्यक्ष संजीव मोरे, महसूल संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल सूर्यवंशी, दिव्यांग विभागाचे सचिव शिवाजी बिवराळे, जिल्हा परिषद विभाग रायगडचे जिल्हाध्यक्ष खंडू बागुल, कार्याध्यक्ष सचिन ओव्हाळ, कोषाध्यक्ष विकास बडे, चिटणीस संतोष साळगावकर आणि उपाध्यक्ष राजेंद्र गायकवाड तर प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार (महसूल) चंद्रसेन पवार व रायगड जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. शेवटी रायगड जिल्हाध्यक्ष संजीव मोरे यांनी प्रशासनाचे आणि उपस्थित सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानल्यानंतर बैठकीची सांगता झाली.
