अधिकाऱ्यांसह नाशिकमधील बड्या राजकीय नेत्यांचाही सहभाग ?
हरिभाऊ लाखे
नाशिक –महावितरण कंपनी तसेच बीएसएनएलच्या महागड्या भूमिगत केबलची चोरी करणाऱ्या टोळीचे जाळे उदध्वस्त करण्यात नाशिक गुन्हे शाखेला यश आले असले तरी हे प्रकरण नाशिकपुरता मर्यादित नसल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणात सहा संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे दोन कोटी ८८ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बीएसएनएल आणि महावितरण कंपनीच्या भूमिगत केबल चोरी करणाऱ्या टोळीचे जे सदस्य ताब्यात घेण्यात आले, त्यांच्या चौकशीतून हे जाळे राज्यभर पसरले असल्याचे पुढे आले आहे. या टोळीने राज्यातील विविध शहरांमध्ये सुमारे १० कोटींची केबल चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे.
२०२४ मध्ये नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीएसएनएल कार्यालयाजवळील भूमिगत कॉपर आणि ॲल्युमिनियम केबल चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट -१ च्या पथकाकडून करण्यात येत असताना संशयितांकडून चौकशीदरम्यान चोरीचा माल मुंबईतील भांडूप येथील एका गोदामात ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने भांडूप येथील गोदामावर छापा टाकला. छाप्यात मोठे घबाड हाती लागले. साडेसतरा टन वेगवेगळ्या प्रकारच्या अल्यूमिनियम केबल, साडेचौदा टन जेलिफिल्ड वायरमधून वेगळे केलेले कॉपर असा एकूण २ कोटी ८८ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात वहाब अब्दुल नवाज, सुरेश दिलीप वैराळ, बसंतलाल राजाराम यादव, कमलेशकुमार सुखदेव रविदास, तनवीर मुफसीर शेख आणि राजकुमार केशुलाल जैन यांना अटक करण्यात आली. तपासादरम्यान संशयितांकडून सरकारवाडा, मुंबई नाका, इंदिरानगर आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील केबल चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, हे प्रकरण खूपच गंभीर असल्याचे संशयितांच्या चौकशीतून आढळून आल्याचे पुढे आले आहे. काही बड्या राजकीय नेत्यांसह संबंधित कंपनीचे अधिकारी आणि अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्क्रॅप व्यवसायात सराईत गुन्हेगारांनी केलेला शिरकाव चिंताजनक आहे. ‘सिंडिकेट’ कडून मोठ्या प्रमाणावर कमिशन मिळत असल्याने बाहुबली लोकप्रतिनिधींकडून आंतरराज्य टोळीला संरक्षण मिळत असल्याने या व्यवसायात बड्या राजकीय नेत्यांचा सहभाग पुढे येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
दरम्यान, भांडुप गोदामातील कारवाई गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रशांत मरकड, देवीदास ठाकरे, उत्तम पवार, नाझीमखान पठाण, विशाल काठे, मिलिंदसिंग परदेशी, पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे, मुख्तार शेख, श्रीकांत सूर्यवंशी, सुनील भोसले, उपनिरीक्षक किरण शिरसाठ, हवालदार दीपक पाटील, दीपक दिवटे, अंमलदार समाधान पवार यांनी केली. गुंडाविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, राजेश राठोड, कल्पेश जाधव, गणेश भागवत व त्यांच्या पथकाने तसेच अंबड गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, भूषण सोनवणे आणि भगवान जाधव यांनीही सहकार्य केले.
००००
