मुंबई : गेल्या सात वर्षांत स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने महाराष्ट्रात जलसुरक्षा, आरोग्यसेवा, रोजगारनिर्मिती आणि हवामान बदलाला तोंड देण्यासाठी राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा राज्यातील ८.३ लाखांहून अधिक नागरिकांना थेट लाभ झाला असून, या उपक्रमांनी राज्याच्या सर्वांगीण विकासाला महत्त्वपूर्ण हातभार लावला आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य शासन आणि खासगी क्षेत्र यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे विकासाचे लाभ समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचत आहेत. जलसंवर्धन, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि आरोग्यसेवा या क्षेत्रांमध्ये स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने केलेले कार्य राज्याच्या विकास उद्दिष्टांना पूरक ठरत आहे. बँकेच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये महिलांचा सहभाग ५२ टक्क्यांहून अधिक असून, महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांमध्ये तसेच राज्यातील ७५ टक्के आकांक्षी जिल्ह्यांमध्ये हे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले आहेत.
जलसुरक्षा उपक्रमांतर्गत १.०६ अब्ज लिटर गोड्या पाण्याची साठवण क्षमता निर्माण करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त भागांमध्ये ४५ वॉटर एटीएम उभारण्यात आले असून, मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील २७१ गावांमध्ये जलसुरक्षा मजबूत करण्यात आली आहे. याशिवाय ८ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना जलसंवर्धन आणि हवामान-सुसंगत शेती तंत्रज्ञानासाठी मदत देण्यात आली आहे. हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी ७ लाख वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. रोजगार आणि कौशल्य विकास क्षेत्रात ६ हजार ५९८ युवकांना प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यापैकी ६३ टक्के युवकांना रोजगार मिळाला आहे. इलेक्ट्रिक वाहने, वाहन उद्योग, कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रॉनिक्स, बँकिंग आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. या लाभार्थ्यांचे सरासरी वार्षिक उत्पन्न १.६६ लाख रुपये इतके नोंदविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ६१ टक्के लाभार्थी महिला असून ७५८ महिला सूक्ष्म उद्योजिकांना आर्थिक सहाय्य पुरविण्यात आले आहे.
आरोग्य क्षेत्रात बँकेच्या ‘सीईंग इज बिलिव्हिंग’ उपक्रमांतर्गत ४ लाख ३९ हजार ६८८ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली, तर ३८ हजार ६२५ नेत्रशस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या. राज्यभरात ४९ दृष्टी केंद्रे स्थापन करण्यात आली असून ही केंद्रे स्वयंपूर्ण पद्धतीने कार्यरत आहेत. या केंद्रांमधून दरवर्षी सुमारे १.६ कोटी रुपयांचे उत्पन्न निर्माण होत आहे. स्टँडर्ड चार्टर्ड बँक, भारतच्या शाश्वतता विभागाच्या प्रमुख करुणा भाटिया यांनी सांगितले की, वंचित आणि दुर्लक्षित समुदायांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी बँक कटिबद्ध असून, महाराष्ट्रातील जलसुरक्षा, आरोग्य आणि रोजगार क्षेत्रातील उपक्रम ही बँकेच्या दीर्घकालीन सामाजिक बांधिलकीची प्रभावी उदाहरणे आहेत.
००००००००
