गुजराती नगरसेवक सन्मान सोहळ्यात डॉ. हेमराज शाह यांच्या कार्याचा गौरव
मुंबई : कोणतीही राजकीय सत्ता किंवा पद हाती नसतानाही बृहन्मुंबई गुजराती समाजाची स्थापना करून, सात मजली गुजराती समाज भवन उभारून आणि समाजसेवेची अखंड परंपरा जोपासून डॉ. हेमराज शाह यांनी मुंबईकरांसह लाखो गुजराती भाषिकांची ऐतिहासिक सेवा केली आहे, असे गौरवोद्गार डॉ. कुंदन व्यास यांनी काढले. ओशिवरा-जोगेश्वरी येथील नवनीत गुजराती समाज भवनमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या गुजराती भाषिक नगरसेवकांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
डॉ. कुंदन व्यास म्हणाले की, डॉ. हेमराज शाह यांनी केवळ गुजराती समाजाची नव्हे तर संपूर्ण मुंबई शहराची सेवा केली आहे. नगरसेवक हा नागरिक आणि शासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा असून शहरातील प्रश्न सोडविण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे नगरसेवकांचा सन्मान हा समाजासाठी प्रेरणादायी ठरतो.
यावेळी माजी खासदार मनोज कोटक यांनी सांगितले की, समाजाकडून मिळणारा सन्मान नगरसेवकांची जबाबदारी अधिक वाढवितो. तब्बल ७५ पुस्तकांचे लेखन व संपादन करणारे डॉ. हेमराज शाह हे खऱ्या अर्थाने “विक्रमादित्य” आहेत. नगरसेवकांनी जाती, धर्म आणि भाषेच्या भिंती ओलांडून सर्वसमावेशक दृष्टीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रवीण छेडा, जितेंद्र पटेल, संध्या विपुल दोशी, सिद्धार्थ शर्मा, संदीप दिलीप पटेल आणि सुनीता मेहता यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
प्रास्ताविकात डॉ. हेमराज शाह यांनी सांगितले की, बृहन्मुंबई गुजराती समाजातर्फे गुजराती नगरसेवकांचा सन्मान करण्याची ही तिसरी वेळ आहे. १९९७ मध्ये प्रथमच अशा स्वरूपाचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. गुजराती समाजाने सुमारे १०० कोटी रुपये खर्च करून उभारलेले सात मजली समाज भवन हे समाजाच्या एकजुटीचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.
बृहन्मुंबई गुजराती समाजाचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. नागजी रीटा यांनी समाजाला आपल्या नगरसेवकांचा गौरव करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. नगरसेवकांनी असे कार्य करावे की ज्यामुळे संपूर्ण गुजराती समाजाला अभिमान वाटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सन्मानित नगरसेवकांच्या वतीने बोलताना संध्या विपुल दोशी यांनी हा सन्मान जनतेचा असल्याचे सांगितले. तर प्रवीण छेडा यांनी समाजाकडून मिळालेला सन्मान हा कर्तव्याची जाणीव करून देणारा असल्याचे मत व्यक्त केले. या प्रसंगी राजेश दोशी, हिराचंद दंड, दिनेश टी. शाह, चिमन मोता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
