नाशिक : अजित पवारांची ख्याती सध्या धमकी बहाद्दर अशी झाली आहे. रोज उठून ते सध्या मतदारसंघात 10 लोकांना धमक्या देतात, अशी जोरदार टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे. नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
अजित पवार यांनी २०१९ साली शरद पवारांनी सांगितले म्हणूनच भाजपसोबत गेलो होतो, असे म्हटले आहे. यावर संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, हे अजून किती वेळा बोलणार, गुळगुळीत झाले आहे आता. आता दुसरे काहीतरी बोला. धमकी वगेरे द्या. अजित पवारांची ख्याती सध्या धमकी बहाद्दर अशी झाली आहे. रोज उठून ते सध्या मतदारसंघात 10 लोकांना धमक्या देतात. हे असे वैचारिक वक्तव्य तुम्हाला शोभत नाहीत. अशी टीका त्यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, नरेंद मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत. त्यांनी दोन्ही पक्ष फोडले. त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल. महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. एवढे खोटे बोलणारा पंतप्रधान बघितला नाही. त्यासाठी ऑलिम्पिकमध्ये एखादा खेळ बघावा लागेल. दिवा विझतो तसा तो मोठा होता. तसे पंतप्रधान आहेत.
अमित शाह यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आम्ही ओबीसी आरक्षण रद्द करू असे त्यांनी जाहीररीत्या सांगितले आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने याची नोंद घेतली आहे, इतकेच मी सांगतो असे ते यावेळी म्हणाले.
