‘आगरी ग्रंथालय चळवळ’ संस्था आणि ‘ब-बोली’ मासिकाचे प्रतिनिधी मंडळ यांचे महापौर, आयुक्तांना पत्र
कल्याण : आगरी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सहकार्याने ४००-५०० चौरस फूट जागेत १० हजार पुस्तके, डिजिटल ऑडिओ स्टेशन, ई-लायब्ररी आणि स्मार्ट क्लासरूमसह ‘अत्याधुनिक आगरी ग्रंथालय’ सुरू करण्याची मागणी ‘आगरी ग्रंथालय चळवळ’ संस्था आणि ‘ब-बोली’ मासिकाचे प्रतिनिधी मंडळ यांच्यावतीने करण्यात आली असून त्यांनी याबाबत केडीएमसी महापौर, आयुक्तांना पत्र दिले आहे.
कल्याण-डोंबिवली, ठाणे, पालघर आणि रायगड हा संपूर्ण भौगोलिक पट्टा ऐतिहासिकदृष्ट्या आगरी आणि कोळी समाजाचे मूळ वसतिस्थान आहे. या भूमीच्या विकासात आणि शहरीकरणात इथल्या मूळ भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी देऊन मोठे योगदान दिले आहे. परंतु, झपाट्याने होणाऱ्या या शहरीकरणामुळे आणि जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे आमची मातृभाषा असलेली ‘आगरी बोली’, आमची लोकगीते, पारंपरिक ज्ञान आणि आमचा शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा हळूहळू लोप पावत चालला आहे.
कोणत्याही समाजाची भाषा जिवंत ठेवायची असेल, तर केवळ मौखिक परंपरेवर अवलंबून न राहता तिचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दस्तावेजीकरण करणे काळाची गरज बनली आहे. याच उदात्त हेतूने, ‘आगरी ग्रंथालय चळवळ’ संस्थेच्या वतीने आम्ही आपणास एक नावीन्यपूर्ण ‘अत्याधुनिक डिजिटल आणि ऑडिओ आगरी ग्रंथालय’ उभारण्याचा प्रस्ताव सादर करत आहोत. यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने आपल्या मालकीच्या कोणत्याही मध्यवर्ती ठिकाणी अथवा समाजमंदिरात अंदाजे ४०० ते ५०० चौरस फूट जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या मर्यादित जागेत ‘मोबाईल कॉम्पॅक्टर’ तंत्रज्ञानाचा वापर करून १० हजार पुस्तकांचे संकलन, आगरी साहित्यासाठी एक ई-लायब्ररी, लुप्त पावत चाललेल्या ‘धवला’ गीतांचे जतन करण्यासाठी ‘डिजिटल ऑडिओ स्टेशन’ आणि भावी पिढीला या भाषेची ओळख करून देण्यासाठी एक ‘स्मार्ट क्लासरूम’ उभारण्याचे अत्यंत सूक्ष्म तांत्रिक नियोजन सविस्तर प्रकल्प अहवालात मांडले आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या ‘मराठी भाषा धोरण २०२४’ आणि ‘सांस्कृतिक थोरण २०२४’ मध्ये नमूद केलेल्या बोलीभाषा संवर्धनाच्या उद्दिष्टांशी पूर्णपणे सुसंगत असून, यामुळे केडीएमसीचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात एका ‘संस्कृती-रक्षक’ महानगरपालिकेच्या रूपात प्रस्थापित होईल.
महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रशासनात तंत्रज्ञानाचा वापर आणि ‘सिटीझन सेंट्रिक’ कारभार राबवण्याचा जो संकल्प केला आहे, त्याला हा डिजिटल प्रकल्प अत्यंत पूरक ठरणारा आहे. त्यामुळे या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून या ग्रंथालयासाठी जागा आणि आवश्यक प्रशासकीय व आर्थिक मंजुरी प्रदान करण्याची मागणी आगरी ग्रंथालय चळवळ संस्था आणि ब-बोली च्या वतीने करण्यात आले आहे.
