ठाणे, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय (शतकोत्तर रौप्यमहोत्सवी संस्था) आणि साने गुरुजी बालविकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत, थोर देशभक्त आणि प्रेमधर्माचा संदेश देणारे पूज्य साने गुरुजी यांच्या ७६ व्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती समाजसेवक मारुती विश्वासराव यांनी दिली.
याप्रसंगी ‘पूज्य साने गुरुजी – कर्मयोगी संत’ या विषयावर ज्येष्ठ विचारवंत, सुप्रसिद्ध व्याख्यात्या औसा लातूर येथील आझाद महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या डॉ. कमलताई ठकार यांनी साने गुरुजींच्या जीवनकार्यावर प्रभावी व्याख्यान दिले त्यावेळी त्यांनी हे विचार मांडले. या कार्यक्रमात ‘कथाकथन-तंत्रमंत्र व माझ्या बालसाहित्याचा प्रवास’ या विषयावर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ बालसाहित्यिक व सुप्रसिद्ध कथाकथनकार एकनाथ आव्हाड यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. विद्या प्रभू यांनी त्यांची मुलाखत घेताना बालसाहित्याची निर्मिती, कथाकथनाची कला आणि मुलांच्या संस्कारक्षम जडणघडणीत साहित्याचे महत्त्व या विविध विषयांवर प्रश्न विचारले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साने गुरुजींचे निष्ठावान अनुयायी आणि साने गुरुजी बालविकास मंदिराचे अध्यक्ष यशवंतराव क्षीरसागर होते. यावेळी साने गुरुजी बालविकास मंदिर मासिकाच्या स्मृतिदिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास साहित्यप्रेमी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन प्रमुख कार्यवाह रविंद्र शं. गावडे (मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय) आणि प्रमुख कार्यवाह नरेश सावंत (साने गुरुजी बालविकास मंदिर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. साने गुरुजींच्या विचारांचा, प्रेम, सेवा आणि संस्कारांचा संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प या कार्यक्रमातून करण्यात आला. जीवन यादव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन प्रसाद महाडीक यांनी केली.
०००००००००
