नगरसेवक बाबाजी पाटील, नगरसेविका अर्चना पाटील यांच्या लक्षवेधीनंतर
आरती परब
दिवा,: प्रभाग क्रमांक २९ मधील नगरसेवक बाबाजी पाटील आणि नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांनी महासभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेनंतर प्रशासनाने शिळफाटा परिसरातील अनधिकृत गोडाऊन विरोधात मोठी कारवाई केली. शुक्रवारी (२० जून) आचार गल्ली, शिळफाटा येथे उभारण्यात आलेल्या तब्बल २९ अनधिकृत गोडाऊनवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
दिवा प्रभाग समिती अंतर्गत सौरभ राव, आयुक्त सो. व प्रशांत रोडे, अतिरिक्त आयुक्त सो.(२), यांच्या आदेशान्वये व जितेंद्र निकम,मा. उपायुक्त सो. अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभाग, दीपक झिजांड, उपायुक्त सो. परिमंडळ-1, व सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा प्रभाग समितीमार्फत अनधिकृत गोडाऊनचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानंतर अतिक्रमण विभागाने संबंधित ठिकाणी धडक कारवाई करत अनधिकृत गोडाऊन हटविण्याची मोहीम राबविली.
शिळ परिसरात शासकीय, आरक्षित तसेच सरकारी मालकीच्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोडाऊन उभारण्यात आल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. याबाबत नगरसेवक बाबाजी पाटील व नगरसेविका अर्चना पाटील यांनी महासभेत प्रश्न उपस्थित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत कारवाईला सुरुवात केली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय भूखंड, आरक्षित भूखंड आणि सरकारी मालकीच्या जागांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत गोडाऊन विरोधातील मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. अशा अतिक्रमणांवर कोणतीही दया दाखवली जाणार नसून संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या कारवाईमुळे शिळ परिसरातील अनधिकृत बांधकाम धारकांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
