ठाणे : ठाण्याच्या अद्वैत ठाणेकरने वयाच्या २० व्या वर्षी ठाणे ते लेह लडाख हे जवळपास साडे तीन हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतर यशस्वीरित्या रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० ‘रुद्र’ या बुलेटवरून पार केले. विशेष म्हणजे या एकल प्रवासात अद्वैतने सर्वात उंचीवर बाईक नेता येणाऱ्या १९,०२४ फूट उंचावर असणाऱ्या उमलिंग ला येथेही बाईक रायडिंग केली.
लहानपणापासूनच अद्वैतला साहस आणि बाईक रायडिंगची ओढ होती. त्यामुळे दुचाकी गाडी चालवण्याचा परवाना हाती येताच अद्वैतने लेह लडाखला बाईक घेऊन जायच्या स्वप्नाच्या दिशेने प्रयत्न सुरू केले. साध्या दुचाकीवर हात साफ होताच अद्वैतने आपल्या आवडीच्या क्लासिक एनफिल्ड ३५० सी सी ‘रुद्र’ बुलेटवर दिर्घ पल्ल्याच्या बाइक रायडिंगचा सराव केला. या रायडिंगमधून मिळालेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर अद्वैतने स्वप्नपूर्ती करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाला आई वडिलांनीही पाठिंबा दिला. त्यानंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अद्वैतने १५ दिवसांच्या ठाणे ते लेह लडाख मोहिमेला सुरुवात केला. एवढ्या मोठ्या प्रवासात अद्वैतला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण या प्रवासात भेटलेले नागरिक, पोलिस यांनी केलेल्या सहकार्यामुळे ही मोहीम यशस्वी झाली असे अद्वैतने सांगितले. अद्वैतच्या या यशाबद्दल त्याच्या आई वडीलांनी आनंद व्यक्त केला. गाडी चालवताना अद्वैत कधी घाई करत नाही. जास्तीत जास्त सुरक्षितपणे गाडी चालवण्याचा त्याचा प्रयत्न असतो, त्यामुळेच लहान वयात एवढ्या लांबच्या प्रवासासाठी आम्ही त्याला पाठिंबा दिल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.
