नगरसेविका नमिता पाटील यांची केडीएमसी आयुक्तांकडे मागणी
कल्याण: कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीने पर्यावरण विभागाची कोणतीही परवानगी न घेता व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प न उभारता केलेल्या बांधकामाला त्वरित स्थगिती देण्याची मागणी प्रभाग क्र. ४ च्या शिवसेना नगरसेविका नमिता पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या असमाधानकारक, अनागोंदी कारभाराबाबत केडीएमसी नगरसेवकांनी सभागृहात तहकुचीची मागणी केली होती. त्या विषयावर सविस्तर चर्चा करून, पुढील कार्यवाहीसाठी माहिती मिळेपर्यत आणि अंतिम निर्णय होईपर्यंत या विषयाला स्थगिती देण्यात आली होती. असे असतांनाही कृषी उत्पन्न बाजार समितीने अनेक इमारतीच्या बांधकामाची परवानगी मिळवली आहे. नियमांनुसार, ज्या ठिकाणी वीस हजार चौरस मीटर पेक्षा जास्त क्षेत्राचे बांधकाम असते, तिथे पर्यावरण विभागाचा दाखला घेणे बंधनकारक आहे. तसेच, तिथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे अत्यंत आवश्यक असते.
परतु, कृषी उत्पन्न बाजार समितीने या नियमाची सर्रास पायमल्ली केली आहे. या बांधकामांचे सांडपाणी थेट बाजूलाच असलेल्या तलावात जात असून, यामुळे पर्यावरणाचे आणि निसर्गाचे अपरिमित नुकसान होत आहे. नियमानुसार एसटीपी प्लांट उभारणे आणि पर्यावरणाचा दाखला घेणे बंधनकारक असतानाही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन, जोपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती साडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधत नाही आणि पर्यावरण विभागाचा ‘ना हरकत दाखला सादर करत नाही, तोपर्यंत त्यांना कोणत्याही नवीन बांधकामाची परवानगी देऊ नये. तसेच, पूर्वी दिलेल्या सर्व बांधकाम परवानग्या त्वरित स्थगित करण्यात याव्यात आणि त्याना ‘बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देखील देण्यात येऊ नये अशी मागणी शिवसेना नगरसेविका नमिता पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे.
000000000
