ठाणे- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत ठाणे जिल्हा ग्रामीणमध्ये रविवार, २८ जूनला ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस पाजण्याची व्यापक मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ या पाच तालुक्यांमध्ये एकूण १,६९९ लसीकरण बूथवर १ लाख १७ हजार २४९ बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला.
तालुकानिहाय आकडेवारीनुसार शहापूर तालुक्यात ४९० बूथवर अपेक्षित २७,४०० बालकांपैकी २६,१७३ बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यात आला. मुरबाड तालुक्यात ३३० बूथवर अपेक्षित १२,०५० बालकांपैकी ११,६९२ बालकांचे लसीकरण करण्यात आले. भिवंडी तालुक्यात ४४५ बूथवर अपेक्षित ४१,०५२ बालकांपैकी ३५,६७३ बालकांना डोस देण्यात आला. कल्याण तालुक्यात २३५ बूथवर अपेक्षित २८,७५२ लाभार्थ्यांपैकी २५,९५२ बालकांचे लसीकरण करण्यात आले, तर अंबरनाथ तालुक्यात १९९ बूथवर अपेक्षित १९,१६३ बालकांपैकी १७,७५९ बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस पाजण्यात आला.
या मोहिमेचा शुभारंभ प्राथमिक आरोग्य केंद्र पडघा, भिवंडी येथे आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र निळजे, ता. कल्याण येथे आमदार राजेश मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पल्स पोलिओ अभियानाचा प्रारंभ झाला.
मोहिमेच्या अंमलबजावणी दरम्यान राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक डॉ. बाळासाहेब सोनावणे, ठाणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ. अशोक नांदापुरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती शिंदे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. बालाजी गावडे तसेच जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी संजय जाधव यांनी विविध लसीकरण केंद्रांना भेट देऊन मोहिमेचे पर्यवेक्षण केले.
ठाणे जिल्ह्यात ही मोहीम जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबविण्यात आली. मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संघटना तसेच सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने कार्य केले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील एकाही बालकाला पोलिओ प्रतिबंधक डोसपासून वंचित ठेवले जाणार नाही. ज्या बालकांना रविवारी बूथवर येऊन डोस घेता आला नाही, अशा सर्व ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांपर्यंत पुढील तीन दिवस घरभेटीद्वारे पोहोचून लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे.
“पोलिओमुक्त भारताची वाटचाल अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक डोस पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. आरोग्य विभाग, आशा व अंगणवाडी सेविका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वित प्रयत्नांमुळे ही मोहीम यशस्वी ठरली आहे. ज्या पालकांच्या मुलांना अद्याप डोस मिळालेला नाही, त्यांनी घरभेटीच्या वेळी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करून प्रत्येक बालकाचे पोलिओपासून संरक्षण सुनिश्चित करावे.” – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव
पोलिओसारख्या गंभीर आजारावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी प्रत्येक बालकाचे लसीकरण आवश्यक असून, पालकांनी आरोग्य विभागाच्या या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
0000
