डॉ. अशोक ढवळे यांची घोषणा
अनिल ठाणेकर
ठाणे, शेतकरी, कामगार व शेतमजुरांच्या प्रश्नांवर १० ऑगस्ट रोजी देशभर प्रत्येक जिल्हा स्तरावर होत असलेले जेल भरो आंदोलन श्रमिकांचे प्रश्न धसास लावण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा संघर्ष ठरणार आहे. १० ऑगस्टच्या या लढ्यात संपूर्ण ताकदीने सामील होण्याचे आवाहन किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे व राष्ट्थीय सरचिटणीस विजू कृष्णन यांनी केले आहे.
अखिल भारतीय किसान सभा या देशव्यापी संघटनेच्या केंद्रीय किसान कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई येथील वाय.एम.सी.ए. सेंटर येथे २८ व २९ जून रोजी संपन्न झाली. सरकारच्या धोरणांमुळे शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात तीव्र झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या प्रश्नांची दोन दिवस सखोल चर्चा केल्यानंतर किसान सभेने हे प्रश्न केंद्रस्थानी आणण्यासाठी शेतकऱ्यांचा देशव्यापी संघर्ष तीव्र करण्याची हाक दिली आहे.
शेतीमालाचे पडलेले भाव, वाढता उत्पादन खर्च, पीक विमा, जमीन अधिग्रहण, खतांची कमतरता, फसव्या कर्जमाफी योजना, अन्न महामंडळाचे महत्व संपवण्याचे कारस्थान, ऊस दर, भारत अमेरिका, भारत युरोप, व भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे भारतीय शेतीवरील दुष्परिणाम इत्यादी प्रश्नावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या व श्रमिकांच्या इतर प्रश्नांवर देशव्यापी संघर्ष तीव्र करण्याची हाक देण्यात आली.
शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर इतर शेतकरी संघटनांना एकत्र करत शेतकरी संघटनांची देशव्यापी एकजूट मजबूत करण्याची आवश्यकता आहे. २८ जुलै रोजी या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी व संघर्ष तीव्र करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत घेण्यात येणार असून यात किसान सभा सहभागी होऊन आपले योगदान देईल हा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
शेतकरी एकजुटीला श्रमिक एकजुटीत परिवर्तित करून सरकारच्या श्रमिक विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा व केंद्रीय कामगार संघटनांची २९ जुलै रोजी राष्ट्रीय पातळीवर होत असलेली संघर्ष परिषद यशस्वी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
किसान सभेच्या स्थापनेला ९० वर्षे पूर्ण होत असल्याने संपूर्ण देशभर या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्याची हाक यावेळी देण्यात आली.१५ नोव्हेंबर रोजी हुतात्मा बिरसा मुंडा जयंती दिनी किसान सभेचे ध्वजारोहण करून देशातील हजारो गावांत शेतकरी प्रश्नांवर सभा, व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अधिवेशन १८ ते २१ नोव्हेंबर २०२६ रोजी तेलंगणा राज्यातील नलगोंडा येथे होत असून याबाबतही बैठकीत नियोजन करण्यात आले. बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयांमुळे शेतकरी आंदोलनाला आणखी चालना मिळेल असा विश्वास देशभरातून आलेल्या शेतकरी नेत्यांनी व्यक्त केला.
००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *