नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने बेलापूर विभागातील दोन अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई केली. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त (२) डॉ. राहुल गेठे आणि उपआयुक्त (अनधिकृत बांधकाम नियंत्रण) डॉ. अमोल पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
महापालिकेने आग्रोळी गाव, सेक्टर-२९ येथील आयटीआयजवळील शंकर पौश्या माळी यांच्या बांधकामास तसेच करावे गाव, सेक्टर-३६ येथील महापालिका शाळेमागील संपूर्णा सिद्धार्थ भोईर व इतर बांधकामधारकांच्या अनधिकृत बांधकामांना महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना (एमआरटीपी) अधिनियमाच्या कलम ५४ अन्वये नोटिसा बजावल्या होत्या. संबंधितांनी स्वतःहून बांधकाम हटविण्याऐवजी ते सुरूच ठेवल्याने महापालिकेने २५ जून रोजी तोडक कारवाई केली.
‘अ’ विभाग कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी प्रशांत नेरकर, सहाय्यक अभियंता आत्माराम काळे यांच्यासह विभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. कारवाईसाठी १५ मजूर, एक गॅस कटर, पाच हॅमर आणि एक जेसीबीचा वापर करण्यात आला. तसेच स्थानिक पोलिस, अतिक्रमण विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महापालिकेने अनधिकृत बांधकामांविरोधातील अशा प्रकारच्या कारवाया पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *