अनिल ठाणेकर
ठाणे, नौपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व स्पा व मसाज सेंटरची चौकशी करून गैरप्रकार करणारी सेंटर तत्काळ बंद करावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक योगेश आव्हाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दादा पाटील वाडी येथील एका कॉम्प्लेक्समधील सदनिकेत वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी नौपाडा पोलिसांना निवेदन दिले. या वेळी नौपाडा मंडल महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघुले, संतोष साळुंखे, प्रशांत कळंबटे, राजेश ठाकरे, सई कारुळकर, भाग्यश्री मुळे, राणी क्षीरसागर, भक्ती मोहिते, मनोज स्नेही, हिमांशू राजपूत आदी उपस्थित होते. यापूर्वी गेल्या वर्षी स्टेशनजीकच्या पॅराडाईज टॉवरमध्ये स्पा सेंटरमध्ये गैरप्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळीही पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना निवेदन देण्यात आले होते. तसेच शांत, सुशिक्षित नौपाड्यात गैरप्रकार रोखण्यासाठी दाद मागण्यात आली होती.
संबंधित स्पा सेंटरला घर भाड्याने देण्याबाबतचा करार नोंदणीकृत केला आहे का, पोलिस स्टेशनकडून व्हेरिफिकेशन केले आहे का, संबंधित मसाज सेंटरकडे मसाज सेंटर व्यवसाय नोंदणीचा परवाना आहे का, याची चौकशी करावी. नौपाड्यातील सर्व स्पा सेंटरचे चालक व जागा भाड्याने देणारे मालक यांच्या भाडेकराराची तपासणी करून पोलिस चौकशी करावी. तसेच परिसरातील नागरिकांकडून तोंडी वा फोनवर तक्रार आल्यास तत्काळ दखल घ्यावी, पोलिसांच्या गस्ती पथकाकडून सातत्याने तपासणी मोहीम राबवावी, स्पा सेंटर व मसाज सेंटरला जागा भाड्याने देणाऱ्या मालकांनी पोलिसांकडून व्हेरिफिकेशन सर्टीफिकेट घेतले नसल्यास संबंधित मालकाविरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
00000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *