कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर गुंड प्रवृत्तीने करण्यात आलेली मारहाण ही अत्यंत निषेधार्ह, दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशन या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत आहे. आरोग्य सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचारी हे समाजाच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत असतात. त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे हे महाराष्ट्र शासनाचे मूलभूत कर्तव्य आहे. मात्र, वारंवार घडणाऱ्या मारहाणीच्या घटनांमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
अशा घटनांना आळा घालण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांविरोधात अधिक कठोर आणि प्रभावी कायदा करण्यात यावा. अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. स्वतःला जनतेचे सेवक म्हणवून घेणारे लोकप्रतिनिधीच जर अशा प्रकारची गुंडगिरी करत असतील, तर महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होतो. अशा प्रवृत्तींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालता कामा नये. या घटनेतील संबंधित डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांना तातडीने न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशनची ठाम मागणी आहे.
या घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र राज्यभर महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीने काळ्या फिती लावून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले असून, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *