रामसेतू पुलाला पाण्याचा स्पर्श
हरिभाऊ लाखे
नाशिक : शहरात गेल्या काही दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू होता. मात्र, मंगळवारी (दि. ७) रात्री नाशिकला पावसाने चांगलेच झोडपून काढले. अवघ्या काही तासांत तब्बल १२० मिमी पावसाची नोंद झाली. या मुसळधार पावसामुळे नाशिककरांची दाणादाण उडाली. गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातील पहिला पूर आला असून नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. रामकुंडावरील प्रसिद्ध दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले, तर रामसेतू पुलालाही पाण्याचा स्पर्श झाला आहे. पुराचे हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी नाशिककरांनी नदीकाठी मोठी गर्दी केली होती.
मंगळवारी रात्री सुरू झालेल्या संततधारेमुळे बुधवारी दुपारपर्यंत पूरपरिस्थिती गंभीर बनली होती. शहरातील सर्वच नाले तुडुंब भरून वाहत असल्याने गोदा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. गंगापूर धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने नदीने रौद्ररूप धारण केले. रामकुंड परिसरातील लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली होती. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्याने पुराचे पाणी हळूहळू कमी झाले.
वाहतूक कोंडी व अडकलेली वाहने: चोपडा लॉन्स परिसरात स्कूल व्हॅन आणि घंटागाडी, तर गंगापूर रोडला कार खड्यात अडकली. सोमेश्वर मंदिर परिसर व कार्बन नाका येथील रस्ते खचल्याने ट्रक अडकले. खर्जुल मळा, टाकळी रोड, आणि सन सिटी कॉर्नर रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
जलमय रस्ते: मखमलाबाद रोडवरील विद्यानगर, कुमावतनगर, ड्रीम कॅन्सल परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले. आरटीओ रोडवर दोन फुटांपर्यंत पाणी साचले होते. गंगापूर रोडवरील ट्रँडेंड समोरील रस्ता पूर्णपणे पाण्यात अदृश्य झाला होता. काठेगल्ली, महेबुबनगर व वडाळा येथील रस्ते जलमय झाले.
घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी: वीर सावरकर रोड, वडाळा नाका आणि इंदिरानगर परिसरातील नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. आनंदनगर आणि पाथर्डी फाटा परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. पाथर्डी परिसरातील रस्त्यांवर दोन फुटांपर्यंत पाणी होते.
पायाभूत सुविधांचे नुकसान: राजीव गांधी भवनसमोरील नव्याने तयार केलेले रस्ते खचले. पेठ रोड, भाभानगर, काळे मळा, वासननगर, ज्ञानेश्वरनगर, आणि आव्हाड पेट्रोल पंपासमोरील रस्ता खचला. नाशिकरोडला पडलेल्या खड्ड्यांमुळे धोकादायक स्पॉट्स निर्माण झाले. नव्याने बांधलेले चेंबर ओव्हर फ्लो झाल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला. गोल्फ क्लब व इतर परिसर: गोल्फ क्लबसमोरील रस्त्यावर पाणी साचल्याने त्रिमूर्ती चौक आणि खुटवडनगर भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. गोडे कॉलनीतील रस्त्यांवरही पाणीच पाणी झाल्याने वाहने अडकून पडली.
0000000000
