देशी वृक्षप्रजातींना प्राधान्य देण्याची मागणी
अनिल ठाणेकर
ठाणे, ठाणे शहरात पावसाळा सुरू होताच झाडे उन्मळून पडणे, मोठ्या फांद्या तुटणे आणि त्यामुळे वाहतूक तसेच जनजीवन विस्कळीत होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मात्र या घटना केवळ मुसळधार पाऊस किंवा वादळी वाऱ्यांमुळे घडत नसून, त्यामागे मानवनिर्मित कारणांचाही मोठा वाटा असल्याचे पर्यावरण अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महानगरपालिकांनी पारंपरिक पद्धतीऐवजी वैज्ञानिक वृक्ष व्यवस्थापन स्वीकारण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
तज्ज्ञांच्या मते, सततच्या पावसामुळे माती भुसभुशीत होते आणि ताशी ६० ते ८० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मोठ्या झाडांवर अतिरिक्त ताण निर्माण होतो. मात्र रस्त्यांचे काँक्रीटीकरण, पदपथ, मेट्रो, पाइपलाइन किंवा इतर विकासकामांदरम्यान झाडांची मुळे कापली गेल्यास झाडांचा जमिनीवरील आधार कमकुवत होतो आणि ती सहज उन्मळून पडतात.
याशिवाय झाडांच्या बुंध्याभोवती पूर्णपणे काँक्रीट टाकल्याने पाणी आणि हवा मुळांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे मुळे कमकुवत होतात. अवैज्ञानिक छाटणीमुळे झाडांचे संतुलन बिघडते, तर बुरशी, वाळवी किंवा आतून पोकळ झालेली झाडे बाहेरून निरोगी दिसत असली तरी ती धोकादायक ठरतात. स्थानिक हवामानाला न साजेशा परदेशी वृक्ष प्रजातींची लागवडही या समस्येला कारणीभूत ठरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर महानगरपालिकांनी प्रत्येक झाडाचे वैज्ञानिक सर्वेक्षण करून त्याचे वय, आरोग्य, मुळांची स्थिती आणि धोका निश्चित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), LiDAR आणि ध्वनी-आधारित तपासणीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आतून पोकळ किंवा कमकुवत झाडे वेळेत ओळखावीत, अशीही सूचना करण्यात आली आहे.
तसेच पावसाळ्यापूर्वी नियोजनबद्ध आणि वैज्ञानिक छाटणी करणे, झाडांच्या बुंध्याभोवतीचे काँक्रीट काढून मोकळी जागा ठेवणे, विकासकामांदरम्यान मुळांचे संरक्षण बंधनकारक करणे, धोकादायक झाडांचे GIS मॅपिंग करणे आणि नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाइन किंवा मोबाईल अॅप सुरू करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागात आपत्कालीन वृक्ष प्रतिसाद पथक उपलब्ध असावे, जेणेकरून पडलेली झाडे तातडीने हटवता येतील, अशीही शिफारस करण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबई-ठाण्याच्या किनारी, दमट आणि मुसळधार पावसाच्या हवामानाचा विचार करता भविष्यात देशी वृक्षप्रजातींना प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. वड, पिंपळ, उंबर, कदंब, अर्जुन, बहावा, जांभूळ, करंज आणि सप्तपर्णी यांसारख्या मजबूत मुळे, प्रदूषण सहन करण्याची क्षमता आणि स्थानिक जैवविविधतेला पोषक ठरणाऱ्या प्रजाती अधिक प्रमाणात लावण्याची शिफारस करण्यात आली आहे.
याउलट रेन ट्री, गुलमोहर, सुबाभूळ आणि युकॅलिप्टस यांसारख्या परदेशी किंवा तुलनेने कमी सुरक्षित प्रजातींची मोठ्या प्रमाणावर लागवड टाळावी, असेही मत व्यक्त करण्यात आले आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, एकाच प्रकारची हजारो झाडे लावण्याऐवजी विविध देशी प्रजातींची मिश्र लागवड, वैज्ञानिक देखभाल आणि नियमित आरोग्य तपासणी यावर भर दिल्यास पावसाळ्यात झाडे कोसळण्याच्या घटना कमी होतील. त्याचबरोबर शहराला अधिक हिरवाई, सावली आणि पक्षी, फुलपाखरे व इतर जैवविविधतेसाठी सुरक्षित अधिवासही उपलब्ध होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *