नगरसेवक ऍड. आदेश भगत यांचे टोरंट पॉवरला निवेदन
दिवा : शहरातील सार्वजनिक गटारांमध्ये टाकण्यात आलेल्या विद्युत केबलमुळे पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यास अडथळा निर्माण होत असून पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या समस्या अधिक गंभीर होत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक ऍड. आदेश भगत यांनी टोरंट पॉवर लिमिटेडच्या व्यवस्थापकांना निवेदन देत गटारांमधील विद्युत केबल तात्काळ हटविण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक गटारे ही पावसाच्या पाण्याचा निचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठीची सुविधा असून त्यामध्ये विद्युत केबल टाकल्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडतो. परिणामी मुसळधार पावसात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून नागरिक, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. तसेच अपघात, साथीचे आजार आणि विद्युत सुरक्षेचे धोकेही वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
याशिवाय गटारांमधून टाकलेल्या केबलमुळे ठाणे महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना गटारांची नियमित साफसफाई, गाळ उपसा आणि पावसापूर्वीची देखभाल करण्यात अडचणी येत असल्याचे निवेदनात दिले आहे. त्यामुळे गटारांमध्ये कचरा आणि गाळ साचून पाणी तुंबण्याची समस्या अधिक तीव्र होत असल्याचे भगत यांनी म्हटले आहे.
ऍड. आदेश भगत यांनी टोरंट पॉवरने संबंधित यंत्रणांसोबत संयुक्त पाहणी करून सार्वजनिक गटारांमधून टाकण्यात आलेल्या सर्व विद्युत केबल तात्काळ हटवाव्यात किंवा पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यास अडथळा होणार नाही अशा सुरक्षित पर्यायी मार्गाने त्यांचे स्थलांतर करावे, अशी मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारचे काम करण्यापूर्वी संबंधित सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेऊन तांत्रिक निकषांचे पालन करावे, अशीही सूचना त्यांनी केली आहे.
या निवेदनाची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अन्यथा नागरिकांच्या हितासाठी संबंधित प्रशासकीय आणि कायदेशीर प्राधिकरणांकडे दाद मागण्यात येईल, असा इशाराही नगरसेवक ऍड. आदेश भगत यांनी दिला आहे.
00000
