डॉ.प्रीती करवंदे आणि डॉ. उत्कर्षा मनवर यांचे कौतुक
अशोक गायकवाड
रायगड-कर्जत : मुसळधार पावसामुळे मोहिली (ता. कर्जत, जि. रायगड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ८ जुलै रोजी पहाटे साडे तीन वाजता एक अत्यंत आव्हानात्मक प्रसंग घडला. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. केंद्रातील इन्व्हर्टरची क्षमता संपल्याने संपूर्ण रुग्णालय अंधारात होते. अशा बिकट परिस्थितीत, पहाटे ३:३० वाजता एक गरोदर माता ज्योती भालचंद्र मुकणे हिला प्रसूती कळा सुरू झाल्या आणि त्या आपल्या पती आणि आत्या यांच्या सोबत आरोग्य केंद्रात आल्या. तपासणी केली असता पिशवीचे तोंड पूर्ण उघडले होते व बाळाने पोटात विष्ठा केली होती आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीती करवंदे (एमबीबीएस, एमडी) आणि डॉ. उत्कर्षा मनवर यांनी कसलाही विलंब न करता, मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षितपणे प्रसूती पार पाडली व ३ किलो वजनाचे बाळ ( मुलगा) जन्माला आले या मोहिमेत आरोग्य सेविका अंकिता भोईर आणि दक्षता रुठे यांनी मोलाचे सहकार्य व मदत केली. विशेष म्हणजे, डॉ. प्रीती करवंदे यांना शहरात मोठ्या संधी असतानाही गेल्या सात वर्षांपासून ग्रामीण भागात राहून आरोग्य सेवा देत आहेत. त्यांच्या या निष्ठेचे आणि पथकाच्या टीमवर्कचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कामगिरीची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन गुरव यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील कार्यासाठी प्रोत्साहित केले. डॉक्टरांच्या या धाडसामुळे माता आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत.
००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *