महापौर शर्मिला पिंपळोलकर यांचे सर्व अधिकाऱ्यांना निर्देश
ठाणे (09): ठाणे शहरात झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी महापालिकेच्या सर्व प्रभागसमिती सहायक आयुक्तांची तातडीची बैठक घेतली. बैठकीत सर्व सहायक आयुक्तांना समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. शहरात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यावर त्वरित नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येक विभागाने सज्ज राहावे, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा सूचना महापौरांनी दिल्या.
महापालिकेच्या कै. अरविंद पेंडसे सभागृहात झालेल्या बैठकीस सभागृह नेते हणमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, मधुकर बोडके, डॉ. मिताली संचेती, दीपक झिंजाड, सर्व प्रभाग समितीचे सहायक आयुक्त व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
“प्रभागाचा प्रमुख अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्तांनी केवळ कार्यालयात बसून चालणार नाही. आपल्या प्रभागात काय घडत आहे, कोणत्या समस्या आहेत, कोणत्या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो याची प्रत्यक्ष माहिती ठेवली पाहिजे. सर्व सहायक आयुक्तांनी ऑन फिल्ड उतरुन त्या त्या प्रभागातील स्थानिक नगरसेवकांशी समन्वय साधणे गरजेचे असल्याचेही महापौरांनी नमूद केले. कोणत्याही दुर्घटनेस विलंब, समन्वयाचा अभाव किंवा निष्काळजीपणा कारणीभूत ठरल्यास संबंधित अधिकाऱ्यांना वैयक्तिकरीत्या जबाबदार धरले जाईल. सर्व तक्रारींचे निराकरण त्याच दिवशी करण्यावर भर देण्यात आला असून, मी स्वतः वेळोवेळी प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची हयगय सहन केली जाणार नाही, असा कठोर इशाराही यावेळी देण्यात आला.
पावसाळ्याच्या कालावधीत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक २४ तास कार्यरत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक विभाग प्रमुखाने आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना याबाबत लेखी सूचना देण्याचे आदेश देण्यात आले. प्रत्येक प्रभाग समितीत आपत्कालीन कक्ष २४x७ कार्यरत आहेत की नाही हे ही वेळोवेळी पाहण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
वृक्ष पडण्याच्या घटनांवर तातडीने कारवाई
सद्यस्थितीत पावसाने उघडीप घेतली असून पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी वृक्ष व फांद्या पडल्या आहेत. रस्त्याच्या कडेला पडलेला हिरवा कचरा (ग्रीन वेस्ट) उचलून फूटपाथ नागरिकांसाठी मोकळे करुन देण्याच्या सूचना दिल्या. तसेच धोकादायक आणि जीर्ण वृक्षांचे सर्वेक्षण करून आवश्यक छाटणी व निष्कासनाची कारवाई तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिल्या.
खड्डे, चेंबर्स आणि गटारांवर विशेष लक्ष
पावसामुळे निर्माण झालेले खड्डे, उघडी गटारे, मॅनहोल्स आणि सार्वजनिक शौचालयांमधील चेंबर्स यांची तातडीने तपासणी करून दुरुस्ती करण्याचे आदेश संबंधित कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होणार नाही यासाठी प्रत्येक प्रभाग समितीने आपल्या क्षेत्रात नियमित पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वाहतूक कोंडी रोखण्यासाठी समन्वय
वाहतूक कोंडीची प्रमुख कारणे म्हणून रस्त्यांवरील पूरस्थिती, अनधिकृत वाहनतळ आणि फेरीवाल्यांचा उल्लेख बैठकीत करण्यात आला. या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून संवेदनशील ठिकाणांची ओळख पटवून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेश परिमंडळ उपायुक्तांना देण्यात आले.
धोकादायक होर्डिंग्ज आणि इमारतीवर कारवाई करावी
धोकादायक व अनधिकृत होर्डिंग्जचे सर्वेक्षण करून असुरक्षित होर्डिंग्ज तातडीने हटविण्याचे आदेश देण्यात आले. त्याचबरोबर मोडकळीस आलेल्या आणि धोकादायक इमारतींची यादी अद्ययावत करून संबंधितांना नोटिसा बजावण्यात याव्यात तसेच लोकप्रतिनिधींकडून अशा इमारतींबाबत माहिती मिळाल्यास त्वरित कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले.
उघडे कचरा स्पॉट्स आणि नालेसफाईवर भर
पावसाळ्यात कचरा साचून नाले तुंबण्याच्या घटना टाळण्यासाठी सर्व उघड्या कचरा ठिकाणांची विशेष पाहणी करून स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले. रस्त्यांवर किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा पडून राहणार नाही याची दक्षता घेण्याबरोबरच रोगराई रोखण्यासाठी औषध फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागाला सतर्कतेचे आदेश
दूषित पाण्यामुळे उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांचा धोका लक्षात घेऊन जलस्रोतांच्या गुणवत्तेची तपासणी वाढविण्याचे आदेश पाणीपुरवठा विभाग व आरोग्य विभागाला देण्यात आले. दूषित पाणीपुरवठा आढळल्यास तात्काळ क्लोरीनेशन आणि शुद्धीकरणाची प्रक्रिया राबविण्याचे निर्देशही देण्यात आले.
शहरातील सखल भागात २४ तास यंत्रणा सज्ज
शहरातील पूरप्रवण व तीव्र परिस्थिती निर्माण होणाऱ्या ठिकाणी आवश्यक पंप, मनुष्यबळ, लाईफ जॅकेट, दोरखंड, बॅरिकेड्स आदी साधनसामग्रीसह यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले. अशा ठिकाणी २४ तास नियंत्रण आणि प्रतिसाद यंत्रणा कार्यरत ठेवण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन विभागाला देण्यात आले आहेत.
