देशभरातील ८०० खेळाडूंचा सहभाग
मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आणि संभाजीनगर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ते २३ जुलै २०२६ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर येथील गारखेडा स्टेडियम येथे राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील अनुभवी आणि नामांकित मास्टर्स खेळाडूंच्या सहभागामुळे ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावरील एक महत्त्वाची क्रीडा स्पर्धा ठरणार आहे.
राज्य संघटनेचे अध्यक्ष संजीवन भास्करन, अर्जुन पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय पंच तसेच शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित सचिव संजय प्रतापराव सरदेसाई, सचिव सुरेश बाहुले आणि संभाजीनगर पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सहसचिव जस्वीरसिंग भाटिया यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात सुरू आहे. स्पर्धेचे उद्घाटन नामदार संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार असून, या कार्यक्रमाला संदीपानराव भुमरे, खासदार विलास (बापू) भुमरे, पैठणचे आमदार, माजी महापौर त्र्यंबक भाऊ तुपे तसेच नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ही स्पर्धा क्लासिक आणि इक्विप्ड अशा दोन गटांमध्ये होणार असून, ४०, ५०, ६० आणि ७० वर्षांवरील पुरुष व महिला मास्टर्स खेळाडू यात सहभागी होतील. देशभरातून सुमारे ८०० खेळाडू, १०० पंच आणि प्रशिक्षक स्पर्धेसाठी उपस्थित राहणार असून, त्यामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंचाही समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन दुसऱ्यांदा होत असून, या स्पर्धेमुळे शहराच्या क्रीडा क्षेत्राला राष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष सतीश कुमार, अर्जुन पुरस्कार सन्मानित राष्ट्रीय सचिव पी. जे. जोसेफ तसेच संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेचे यशस्वी आयोजन आणि पंचगिरीसाठी महाराष्ट्रातील शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित राष्ट्रीय पंच संजय माधव, अनंत चाळके, सूर्यकांत गद्रे, सतीश पाताडे, पुण्याचे गिरीश गिंडी, राजहंस मेहंदळे, किरण त्यागी, आंतरराष्ट्रीय पंच विजय पाटील तसेच आंतरराष्ट्रीय पंच आणि शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित रक्षा महाराव यांची उपस्थिती लाभणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील पॉवरलिफ्टिंगला नवी चालना मिळण्यासोबतच अनुभवी खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *