– मागण्यासाठी शिक्षकांचे आंदोलन
अनिल ठाणेकर
ठाणे : BLO/SIR रद्द करा, शिक्षकांना TET सक्ती नको, तात्काळ FIR मागे घ्या. या मागण्यासाठी मुंबईतील शिक्षकांच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन आझाद मैदान येथे जोरदार आंदोलन केले, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली.याप्रसंगी शिक्षक आमदार किरण सरनाईक, किशोर दराडे, विक्रम काळे, ज्ञानेश्वर म्हात्रे, जयंत आसगावकर, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे, उपाध्यक्ष नंदा कांबळे, केशव जाधव, राजेश सुर्वे, देवीदास पंडांगळे आदी उपस्थित होते.
शिक्षण विभागाने पगार कपातीचे पत्र काढूनही हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक आणि मुख्याध्यापक आंदोलनात सहभागी झाले होते. शिक्षणमंत्री मा.  दादाजी भुसे यांच्या सोबत झालेल्या चर्चेनुसार मुंबईतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या BLO SIR ड्युटीच्या प्रश्नांबाबत महानगरपालिका आयुक्त, शिक्षण उपायुक्त आणि महसूल विभागाचे अधिकारी यांच्यासोबत संयुक्त मिटिंग  घेऊन निर्णय घेण्याचे सांगितले. यापुढे मुंबईतील एकाही शिक्षकांवर ड्युटी नाकारली म्हणून FIR  होणार नाही तसेच ज्यांच्यावर FIR झाले आहेत ते तात्काळ मागे घेण्याबाबत आदेश देण्यात येईल, असे आश्वासन दिले. TET सक्तीतून शिक्षकांना दिलासा देण्याबाबत शासन सकारात्मक असून कार्यरत शिक्षकांसाठी वेगळी परीक्षा घेण्याच्या पर्यायाचा विचार करत आहोत, असे शिक्षणमंत्र्यांनी बैठकीत सांगितले.
BLO/SIR ड्युटी करताना मृत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक कोटी नुकसान भरपाई द्यावी, शाळांच्या वेळा पूर्वीप्रमाणेच पूर्ण वेळ कराव्यात, महाविद्यालयातील विद्यार्थी (NCC, NSS) आणि सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना BLO/SIR ड्युटी लावली अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांनी केली. शासनाने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यास शाळा वाचवण्यासाठी, विद्यार्थ्यांचे शिक्षण वाचवण्यासाठी अनुदानित शिक्षणाची व्यवस्था टिकवण्यासाठी प्रशासनाच्या बेजबाबदार कारभाराला विरोध करण्यासाठी पुढील आंदोलनात सर्व पालकांना रस्त्यावर उतरवणार असे सुभाष मोरे म्हणाले.
आझाद मैदान येथे झालेल्या आंदोलनात शिक्षक भारती
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटना),बी.एल.ओ. ड्युटी अन्याय निवारण मंच, बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, शिक्षक महासंघ मुंबई कोकण विभाग,महामुंबई शिक्षण संस्था,मुंबई (बृहन्मुंबई) माध्यमिक (उच्च माध्यमिक) शाळा मुख्याध्यापक संघटना,मुंबई आणि उपनगर माध्यमिक शिक्षक संघ,महाराष्ट्र संगीत शिक्षक संघटना, शिक्षण बचाव मंच,प्रहार शिक्षक संघटना, आदर्श शिक्षक सेवा संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *