– ज्येष्ठ नागरिक सेवा समितीचा उपक्रम
मुंबई: पामबीच ज्येष्ठ नागरिक सेवा समितीच्या वतीने नुकतेच विरंगुळा केंद्रात सानपाडा येथील भारत ई सेवा केंद्राच्या  सहकार्याने  नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत आणि नगरसेवक निशांत भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एनसीएमसी  स्मार्ट कार्डचे नोंदणी शिबिर संपन्न झाले.  उपमहापौर दशरथ भगत यांनी याप्रसंगी सांगितले की, उरलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अशाच प्रकारचे शिबिर पुन्हा आयोजित केले जाईल.  त्यावेळेस इतर ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. या शिबिरात १०६ ज्येष्ठ नागरिकांनी एनसीएमसी कार्डसाठी आपल्या नावाची नोंदणी करून,  या योजनेचा लाभ घेतला. शिबिर आयोजन करण्यासाठी पामबीच ज्येष्ठ नागरिक सेवा समितीचे अध्यक्ष देवेंद्र खाडे, सचिव चंद्रकांत काळे, खजिनदार हेमंत देसाई, इतर पदाधिकारी आणि कार्यकारी मंडळाने विशेष परिश्रम घेतले. एनसीएमसी कार्ड नोंदणीसाठी सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव, भारत ई सेवा केंद्राच्या विजया विश्वासराव, दिपाली पाटील यांनी मदत केली.  एनसीएमसी म्हणजे राष्ट्रीय सामायिक परिवहन कार्ड असून हे ‘वन नेशन, वन कार्ड’ या संकल्पनेवर आधारित आहे. हे कार्ड मेट्रो, बस, लोकल ट्रेन, टोल, पार्किंग यासाठी वापरण्याची सोय असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसमध्ये ६५ वर्षावरील पुरुषांना  ५० टक्के व ७५ वर्षावरील ज्येष्ठांना विनामूल्य प्रवासाची सवलत मिळते.  महिलांसाठी ही सवलत १२ वर्षानंतर लागू आहे.  खरेदी व इतर रक्कम अदा करण्यासाठी डेबिट कार्ड प्रमाणे हे कार्ड वापरता येते.  या कार्डची एकदाच नोंदणी केल्यानंतर वारंवार कागदपत्रे दाखवण्याची  आवश्यकता  रहात नाही. शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी नाव नोंदणीसाठी शिस्तीचे पालन केले,  त्याबद्दल पामबीच ज्येष्ठ नागरिक सेवा समितीच्या वतीने सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आभार मानण्यात आले.
00000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *