अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर तब्बल सात महिन्यानंतर विषय समित्या आणि सभापती पदाची निवड अखेर बिनविरोध झाली. १७ सदस्यांच्या समितीत भाजपा गटबंधन ८ तर शिवसेना गटबंधन ९ अशा सदस्य संख्याबळानुसार सभापती पदाची निवड खेळीमेळीत पार पडली. यामध्ये बांधकाम समिती सभापती पदी शिवसेनेचे शैलेश भोईर, शिक्षण समिती सभापतीपदी शिवसेनेच्या रेश्मा गुडेकर, उपसभापती शिवसेनेच्या किरण चौबे, नियोजन व विकास समिती सभापती पदी भाजपाचे महेश फुलोरे, महिला व बालकल्याण सभापती पदी भाजपाच्या स्वाती पाटील, तसेच पाणीपुरवठा समिती सभापती पदी राष्ट्रवादीच्या सुनीता तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्ष हे आरोग्य समितीचे पदसिद्ध सभापती असतील असा निर्णय घेण्यात आल्यामुळे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील हे आरोग्य समितीचे सभापती असतील. दरम्यान मागासवर्गीय समितीच्या सभापती पदाची निवडणूक गुरुवारी होणार असून त्यासाठी भाजपने कबीर नरेश गायकवाड यांचे नाव जवळजवळ निश्चित केले आहे.
प्रत्येक विषय समिती करिता एकच नामनिर्देशक पत्र आल्याने कुणी सदस्यांनी माघार घेतलेली नाही त्यामुळे समितीमध्ये केवळ एकच नामनिर्देशन पत्र आल्याने निवड घेण्याची गरज पडलेली नाही. सभापती पदांची निवड झाल्यानंतर स्थायी समिती गठित करण्यात आली. १० सदस्यांच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष या नगराध्यक्ष असतात. प्रत्येक विषय समितीचे सभापती हे स्थायी समितीचे सदस्य मिळून ७ सदस्यांसह उर्वरित नामनिर्देशित तीन सदस्यांमध्ये शिवसेनेचे रवींद्र करंजुले भाजपचे पवन वाडेकर आणि अनिता भोईर यांची स्थायी समिती सदस्य म्हणून निवड झाली.
विषय समित्या सदस्य, सभापती आणि स्थायी समिती निवड प्रक्रियेत पिठासीन अधिकारी म्हणून उल्हासनगरचे प्रांत अधिकारी विजयानंद शर्मा यांनी काम पाहिले. यावेळी मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड उपमुख्याधिकारी उमेश राऊत, महेंद्र नेर यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले. दरम्यान तब्बल सात महिन्यानंतर अंबरनाथ नगरपालिकेला विषय समिती सभापती मिळाले असून आता पालिकेचा कारभार अधिक गतिमान होणार असल्याची प्रतिक्रिया भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि शिवसेनेचे गटनेते रवींद्र करून दिले यांनी दिले.
