कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह अन्य तीन आरोपीना अटक करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून रमेश म्हात्रे यांच्यावर टीका होत असून त्यांच्यावर कायदेशीर आणि पक्षांतर्गत कारवाई करण्याची मागणी सर्वच स्थरातून होत आहे.  याबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दोषीं विरोधात पक्षांतर्गत कठोर शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. मात्र अद्याप रमेश म्हात्रे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्री नगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेली मारहाणीची कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गंभीर दखल घेतली होती. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही माफी दिली जाणार नाही. दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे म्हटले होते. याप्रकरणी रमेश म्हात्रे यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरु असली तरी मात्र पक्षांतर्गत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे अशाप्रकारे कायदा हातात घेणारे लोकप्रतिनिधी अथवा पदाधिकारी यांना पक्ष पाठीशी घालत असल्याच्या चर्चा सर्वसामान्यांमध्ये रंगली आहे. याआधीही अशाप्रकारे कायदेशीर कारवाई झालेल्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई झाली नसल्याने या प्रकरणी देखील रमेश म्हात्रे यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होण्याचे चिन्ह कमी आहेत.
दरम्यान याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांना विचारले असता, रमेश म्हात्रे यांच्यावर कारवाई संदर्भात पक्षांतर्गत काहीही संकेत आले नसल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *