लाल फित बांधून कल्याण बार असोसिएशनचा निषेध
कल्याण : डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालय डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या रिमांड सुनावणीदरम्यान पोलिसांनी वकिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करत कल्याणमधील वकिलांनी आज अनोखे आंदोलन छेडले. न्यायालयीन कामकाज सुरू ठेवत वकिलांनी लाल फित बांधून पोलिस प्रशासनाचा निषेध नोंदवला. या आंदोलनामुळे न्यायालय परिसरात चर्चांना उधाण आले आहे.
डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी रमेश म्हात्रे, यांच्या रिमांड सुनावणीवेळी काही पोलिस अधिकाऱ्यांनी वकिलांना धमकावल्याचा आणि गैरवर्तन केल्याचा आरोप कल्याण बार असोसिएशनकडून करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ आज कल्याण न्यायालयातील वकिलांनी लाल फित बांधून कामकाज सुरू ठेवले. न्यायालयीन प्रक्रियेत वकिलांचा सन्मान राखला जावा आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या अनोख्या आंदोलनामुळे पोलिस आणि वकील यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
शुक्रवारी सुनावणीसाठी आणलेल्या एका राजकीय आरोपीला पोलिसांनी विशेष सुरक्षा पुरवली होती. यावेळी सर्व पोलीस हे त्यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक असल्याप्रमाणे वावरत होते यावेळी पोलिसांनी वकिलांना धक्काबुक्की करत गुन्हा दाखल करू अशी धमकी देत विनापरवानगी वकिलांचे चित्रीकरण केले. याच्या निषेधार्थ हे आंदोलन असून याबाबत लेखी तक्रार न्यायाधीशांकडे करण्यात आली असून उच्चन्यायालयात देखील हि बाब नेणार असल्याचे ऍड श्रद्धा शिवमते जोशी यांनी सांगितले.
तर याआधी कधीही अशाप्रकारे लाल फीत लावून काम करण्याची आवश्यकता वाटली नाही. मात्र वकिलांवर अन्याय झाल्याने हे लालफीत लावून आंदोलन केले आहे. पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली असून जोपर्यत पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत लालफीत लावून आंदोलन करणार असल्याची प्रतिक्रिया ऍड प्रदीप बावस्कर यांनी दिली.
