अनिल ठाणेकर
ठाणे: ठाण्यातील प्रस्तावित डेटा सेंटर प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या जनआंदोलनाला आता ज्येष्ठ नागरिकांचाही ठाम पाठिंबा मिळाला असून, या लढ्यात ते सक्रिय सहभाग घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या मते, प्रस्तावित डेटा सेंटरमुळे परिसरातील पर्यावरण, ध्वनी प्रदूषण, वाहतूक कोंडी, उष्णतेत वाढ आणि नागरिकांच्या आरोग्यावर होणारे संभाव्य परिणाम यांचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिकांनाच बसू शकतो. त्यामुळे हा प्रश्न केवळ विकासाचा नसून सार्वजनिक आरोग्य आणि जीवनमानाशी संबंधित असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांनी स्थानिक नागरिकांसह प्रस्तावित प्रकल्पाविरोधातील आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरणाचे संरक्षण, नागरिकांचे आरोग्य आणि भविष्यातील पिढ्यांच्या हितासाठी हा लढा अधिक व्यापक करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे प्रकल्पाबाबत संपूर्ण पारदर्शकता ठेवण्याची, पर्यावरणीय परिणामांचा सखोल अभ्यास सार्वजनिक करण्याची आणि स्थानिक नागरिकांच्या आक्षेपांचा गांभीर्याने विचार करण्याची मागणी केली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागामुळे या आंदोलनाला अधिक बळ मिळणार असून, नागरिकांच्या आरोग्य व पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *