कल्याण : शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा मुलगा प्रवीण म्हात्रे हे विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यामुळे मागील वर्षभरापासून फरार आहेत. सतत पाठपुरावा करूनही पोलीस त्यांना अटक करत नाहीत म्हणून या प्रकरणातील तक्रारदाराने कल्याणमध्ये पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर भर पावसात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. परंतु, कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून पोलिसांनी त्यांना खडकपाडा पोलीस ठाण्यात आणले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते तक्रारदार कल्पेश जोशी यांनी हे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. प्रवीण म्हात्रे यांनी दादागिरी, दांडगाईचा अवलंब करून डोंबिवली पश्चिमेत जुनी डोंबिवली भागात इतर भूमाफियांच्या सहकार्याने आरोही हाईट्स नावाने बेकायदा इमारत उभारली आहे. ही इमारत उभारताना कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या घेण्यात आल्या नाहीत. या इमारतीमधील सदनिका घर खरेदीदारांना विक्री करताना प्रवीण म्हात्रे यांनी पालिका महसूल विभागाचे जुनी डोंबिवली, नवी डोंबिवलीतील सात बारा उतारे, नगररचना, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरी, शिक्क्यांचे कागदपत्र तयार केले.
या भूमाफियांनी डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवली भागातील पालिकेच्या ह प्रभाग हद्दीतील नवीन सर्व्हे क्रमांक १६-१४, नवीन सर्व्हे क्र. २६-१५, नवीन सर्व्हे क्र. २६-१६-१-अ, तसेच नवी डोंबिवलीतील सर्व्हे क्र. ६३-२-ब या मिळकर्तीचे बनावट सात बारा उतारे तयार केले आहेत. या जमिनींशी दुरान्वये संबंध नसताना या सात बारा उताऱ्यात प्रवीण म्हात्रे, राजेंद्र शेरेगर यांची नावे घुसविण्यात आली आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे.
आरोही हाईट्स इमारत अधिकृत आहे हे दाखवून घर खरेदीदारांना या बेकायदा इमारतीमधील सदनिका अधिकृत इमारत म्हणून विक्री करण्यात आल्या आहेत. या बेकायदा इमारतीच्या जमिनीचे सात बारा उतारे महसूल विभागाने तयार आणि भूमाफियांना दिले नसताना दस्त नोंदणी करताना मात्र या बनावट सात बारा उताऱ्यांचा वापर करण्यात आला आहे. तक्रारदार जोशी यांनी महसूल विभागाने आरोही हाईट्स इमारत उभारणी करताना जमीन मालकीचे सात बारा इमारत उभारणाऱ्या माफियांना दिले होते का, अशी विचारणा डोंबिवलीच्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे केली होती.
मंडळ अधिकारी रवींद्र जमदरे यांनी चौकशी करून कल्पेश जोशी यांच्या तक्रारीप्रमाणे अशाप्रकारचे कोणतेही सात बारा उतारे प्रवीण म्हात्रे किंवा इतरांना देण्यात आले नाहीत. या उताऱ्यावरील ग्राम महसूल अधिकाऱ्याची स्वाक्षरी, शिक्का बनावट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. ही सर्व बनावट कागदपत्रे सदनिका विक्री करताना दस्त नोंदणी कार्यालयात नोंदणीकरणासाठी भूमाफियांनी वापरली आहे. या सर्व प्रकरणात शासन, घर खरेदीदार यांची प्रवीण रमेश म्हात्रे यांच्यासह इतर २३ भूमाफियांनी फसवणूक केली म्हणून मंडळ अधिकारी जमदरे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रवीण म्हात्रेसह इतर आरोपी फरार झाले आहेत. याप्रकरणातील प्रवीण रमेश म्हात्रे यांना तातडीने अटक करा, अशी तक्रारदाराची मागणी आहे. या मागणीसाठी त्यांनी शुक्रवारपासून कल्याणमध्ये बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
या गुन्ह्यात महेश पार्टे, गजानन नार्वेकर, यशवंत जोशी, माया पाटील, बनुबाई जोशी, रणजित रामदास जोशी, रवींद्र जोशी, दमयंती जोशी, भारती पाटील, साधना तांबे, विनोद बिभीषण जोशी, अशोक भानजी जोशी, अशोक पांडुरंग जोशी, प्रवीण म्हात्रे, राजेंद्र शेरेगर, वंदना जोशी, विमल जोशी, लक्ष्मीबाई जोशी, शशिकांत जोशी, मार्गेश जोशी, लोकेश गावडा, वर्षा विजय पंडित, विजय गजानन पंडित हेही आरोपी आहेत.
००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *