मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे दि न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनी लिमिटेड सहप्रायोजित १४ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या बुध्दिबळ स्पर्धेत ६ वयोगटामधील विजेतेपदासाठी एकूण ९२ खेळाडूंमध्ये १८ जुलै रोजी चुरस राहील. आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ दिनानिमित्त होणाऱ्या स्पर्धेमधील प्रत्येक वयोगटात मुलांसाठी १० बक्षिसे व मुलींसाठी ५ बक्षिसे दिली जाणार आहेत. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी, संयोजक लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी, सकाळी ९.३० वा. परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहामध्ये होईल.
न्यू इंडिया अॅशुरन्स-आयडियल जलद बुध्दिबळ स्पर्धेत विविध जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटू अर्णव पोर्लेकर, पराव जोशी, निकिता संदीप, राज गायकवाड, निवान छेडा यांच्यासह आयुष जैठलीया, साईश आचरेकर, आनंद चैतन्या, अथर्व मुळीक, आयांश पाटील, अरिंजय भट्टाचार्जी, आर्यन भोसले, विप्रा दांडेकर, जीतेज गाडगे आदी खेळाडू गटविजेतेपदाच्या दावेदारीसाठी उत्सुक आहेत. मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना व राष्ट्रीय मिल मजदूर संघ यांच्या सहकार्याने ८/९/१०/११/१२/१४ वर्षाखालील सहा वयोगटात ही स्पर्धा स्विस लीग पध्दतीच्या किमान ४ फेऱ्यांमध्ये रंगणार आहे. प्रत्येक साखळी फेरी १५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची आहे. दोन गटामध्ये प्रथम पुरस्कार पटकाविणाऱ्या विजेत्यास विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
