निवडणूक आयोगाचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
ठाणे, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR-२०२६) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सॲपवर भारत निवडणूक आयोग (@ecisveep) आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी (@ceo_maharashtra) यांच्या नावाने बनावट संदेश आणि मोबाईल क्रमांक व्हायरल होत असल्याची माहिती समोर आली आहे. या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन निवडणूक यंत्रणेने केले आहे.
व्हायरल होत असलेल्या संदेशात, “SIR-२०२६ दरम्यान मतदाराच्या कागदपत्रांमध्ये विसंगती आढळली असून, दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क न केल्यास मतदार ओळखपत्र हटवले जाईल,” असा दावा करण्यात आला आहे. मात्र हा दावा पूर्णपणे खोटा, दिशाभूल करणारा आणि निराधार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने नागरिकांना अशा कोणत्याही बनावट संदेशांना किंवा अनोळखी मोबाईल क्रमांकांना प्रतिसाद देऊ नये, तसेच कोणतीही वैयक्तिक माहिती किंवा कागदपत्रे शेअर करू नयेत, असे आवाहन केले आहे. मतदार यादी, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR-२०२६) किंवा मतदार ओळखपत्रासंबंधी कोणतीही माहिती केवळ भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकृत माध्यमांवरूनच पडताळून पाहावी, असेही नागरिकांना सांगण्यात आले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि बनावट संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन करत, नागरिकांनी कोणतीही अप्रमाणित माहिती पुढे पाठवू नये, असेही निवडणूक यंत्रणेने स्पष्ट केले आहे.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *