दिनेश मराठे
मुंबई : दक्षिण मुंबईतील डोंगरी येथील मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त विठू नामाचा गजरकरीत डोंगरी परिसरात दिंडी सोहळा साकारला. या दिंडी सोहळ्यात एका फुलांनी सजविलेल्या एका खास पालखीत श्री हरी विठ्ठल रखुमाई यांची मूर्ती विराजित केले होते. यावेळी स्पीकर्सवरील ढोल ताशाच्या वादनाने संगीतमय वातावरणात मुलींनी लेझिम खेळत पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या तसेच रस्त्याच्या धुतर्फा उभे राहून पालखी सोहळ्याचा आनंद घेणाऱ्या लोकांचे लक्ष वेधलेच नव्हे तर त्यांच्या कौतुकाची टाळयांच्या गजरात झालेल्या स्वागतमय कमान उभारली. यावेळी मुलींनी खास करून जय जय राम कृष्ण हरिचा जप केला.तर काही मुलांनी विठ्ठलाचे अभंग गात वातावरण भक्तीमय केले. या दिंडी सोहळ्यात शाळेतील महिला शिक्षिकांनी विशेष मेहनत घेत मुलींना नटवले होते.प्रत्येक मुलीने नेसलेली नऊवारी साडी, केसांचा अंबाडा, गळ्यातील इमिटेशन ज्वेलरी दागिने,कानातील कर्ण फुले, हातातील बांगड्या आणि चेहऱ्यावर साजेसा शृंगार यांच्यासह सादर केलेल्या लेझिम नृत्याचा सुरेख संगम पाहताना एक अनोखा आनंद साऱ्यांच्या चेहऱ्यावर होता. डोईवर भरलेल्या पाण्याच्या घागरी, कलश आणि तुळशी वृंदावन, मुलांच्या हातातील भगवी केशरी अशी भागवत संप्रदयाची धर्मध्वजा, मुखाने होणारा निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या संत शिरोमणीचा जय घोष आणि भेटी लागी जीवा अशी पंढरपूरातील सावळ्या विठ्ठल रखुमाईला घातलेली आर्त साद ही वरुणाच्या वर्षावात जलधारांच्या अभिषेकात वातावरणात विठ्ठलमय झाले होते.
