दिवा : दिवा येथील ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा पवित्र सण अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे विश्वस्त महेंद्र दळवी सर यांच्या हस्ते पालखी पूजनाने झाली. यावेळी शाळेच्या प्राचार्या  ज्योत्स्ना सोनी मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विठ्ठल- रुक्मिणी वेशभूषा, अभंग गायन, नृत्य, लेझीम आणि वारकरी परंपरेवर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यानंतर शाळेतून भव्य पालखी सोहळा व दिंडीचे आयोजन करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. टाळ, मृदंग, लेझीम आणि “ज्ञानोबा- तुकाराम” च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, वारकरी संप्रदायाची ओळख आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला. या यशस्वी दिंडी सोहळ्यासाठी आवश्यक परवानगी व मोलाचे सहकार्य दिल्याबद्दल ग्लोबल इंग्लिश स्कूलतर्फे मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. त्यांच्या सहकार्यामुळे हा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम शिस्तबद्ध आणि सुरळीतपणे पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *