मुंबई, प्रतिनिधी : ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नासिकेत पानसरे यांचा पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. भांडुप येथे कोमसाप आणि स्वर्णिका पुस्तक प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी साहित्य संमेलनात हा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणे, सामाजिक जाणीवा दृढ करणे तसेच जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. सन्मान स्वीकारताना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात पानसरे यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर रितू तावडे, ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ, माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, डॉ. प्रा. प्रदीप ढवळ, कोमसापच्या अध्यक्षा सौ. नमिता कीर, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्यासह साहित्य, पत्रकारिता, कला आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
नासिकेत पानसरे यांना यापूर्वीही पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. पत्रकारितेबरोबरच ते सामाजिक कार्यातही सक्रिय असून ग्राहक पंचायत महाराष्ट्र, मुंबई उपनगर, कुर्ला तालुका येथे कार्यरत आहेत. तसेच विक्रोळी येथील कन्नमवार नगर ज्येष्ठ नागरिक प्रभात मित्र मंडळाचे सचिव म्हणूनही ते उल्लेखनीय कार्य करत आहेत. ग्राहक जनजागृती, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविणे आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांद्वारे त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
0000
