अनिल ठाणेकर
ठाणे- ‘देवधर्म आणि नीती’ या विषयावर मार्गदर्शन करताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही नास्तिकतेचा प्रचार करणारी नव्हे, तर विवेकवादाला प्राधान्य देणारी आणि अज्ञेयवादाची भूमिका स्वीकारणारी संघटना असल्याचे स्पष्ट केले. ‘कार्य-संस्कृती’ या विषयावरील सत्रात त्यांनी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर, अविनाश पाटील, माधव बावगे आणि संजय बनसोडे यांच्या कार्यशैलीची उदाहरणे देत कार्यकर्त्यांनी स्वीकारावयाच्या मूल्यांवर राज्य सरचिटणीस आरती नाईक यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.दोन दिवसीय निवासी चिंतन बैठकीत त्या बोलत होत्या.
या चिंतन बैठकीच्या नियोजनासाठी राज्य प्रधानसचिव विजय परब, ठकसेन गोराणे, राज्य सदस्य नंदकिशोर तळाशीलकर, राज्य सरचिटणीस आरती नाईक, तसेच जिल्हा पदाधिकारी यश सूर्यवंशी, तुषार शिंदे, प्रवीण जावळे आणि संदेश बालगुडे यांनी विशेष परिश्रम घेतले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मुंबई जिल्ह्याच्या वतीने आयोजित दोन दिवसीय निवासी चिंतन बैठक २५ व २६ जुलै रोजी जनता केंद्र, ताडदेव (मुंबई सेंट्रल) येथे उत्साहात पार पडली. या बैठकीस मुंबई जिल्ह्यातील विविध शाखांमधील सुमारे ४० कार्यकर्ते सहभागी झाले.
बैठकीत मागील काही वर्षांतील जिल्हा संघटनेच्या कार्याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून आगामी काळातील संघटनात्मक वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ‘मेरी बात’ या सत्रात कार्यकर्त्यांनी संघटनेकडून असलेल्या अपेक्षा, स्वतःचे अनुभव आणि भविष्यातील योगदान याविषयी मनमोकळेपणाने मते व्यक्त केली. त्यानंतर झालेल्या ‘परस्पर विश्वास आणि संघटनात्मक एकजूट’ या सत्रात अनेक कार्यकर्त्यांनी संघटनेने कठीण प्रसंगी दिलेल्या आधाराचे अनुभव कथन केले. गटचर्चेच्या माध्यमातून संघटनेची ताकद, मर्यादा, कमतरता, संभाव्य धोके, भविष्यातील आव्हाने आणि विविध क्षेत्रांतील कामाच्या संधींचा सखोल आढावा घेण्यात आला. कार्यकर्त्यांनी मांडलेल्या विधायक सूचनांवर चर्चा करून आगामी कृती आराखडा निश्चित करण्यात आला. समारोप सत्रात विविध शाखांच्या अडचणी, अनुभव आणि आव्हानांवर चर्चा करून आगामी वर्षासाठी संघटनात्मक नियोजन करण्यात आले.
