संवेदनशील प्रशासनाचा आदर्श…!
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य र्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली- पागावाडी येथील जनाबाई पाटील यांच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत केली आहे. त्यांच्या पुढाकारामुळे पाटील यांच्या मोडकळीस आलेल्या घराची दुरुस्ती पूर्ण झाली असून शासनाच्या विविध योजनांचाही लाभ त्यांना मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पाटील यांच्या घराचे छप्पर अत्यंत जीर्ण झाल्याने या कुटुंबाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
स्थानिक जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी या संबंधात खेबूडकर यांचे लक्ष वेधले असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर पाटील यांच्या घराच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधीही उपलब्ध करून देत काम पूर्ण होण्यासाठीही पुढाकार घेतला. घराचे काम पूर्ण झाल्यानंतर खेबूडकर यांनी पुन्हा एकदा पाटील यांच्या घरी भेट देऊन घराच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी घरासाठी आवश्यक असलेले दरवाजे तसेच पत्रे व अन्य किरकोळ कामांसाठी स्वतःच्या खिशातूनच आर्थिक मदत केली.
खेबूडकर यांनी या निमित्ताने संवेदनशील प्रशासनाचा आदर्श घालून दिला आहे. खेबुडकर हे एवढेच करून थांबले नाहीत तर त्यांनी या कुटुंबांना अंत्योदय रेशन कार्ड,शासकीय पेन्शन योजनेचा त्यांना लाभ मिळावा तसेच आवश्यक औषधोपचार व पुढे औषधे मिळण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या.
सिंधुदुर्गात जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर खेबुडकर यांनी शिक्षण, आरोग्य, समाज कल्याण, महिला व बालकल्याण या विभागांच्या कामकाजात विशेष लक्ष घालून ग्रामीण जनतेला दिलासा मिळेल असे महत्वाचे निर्णय घेतले आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, अशा सेविका यांच्या प्रश्नात लक्ष घालून त्यांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणावर त्यांचा विशेष भर आहे आणि त्या दृष्टीने ते काम करीत आहेत. जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी आणि त्यांना औषधे घरपोच मिळावीत यासाठी ते सतत आग्रही असतात आणि तशा सूचना त्यानी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. पाटील कुटुंबाच्या बाबतीत खेबुडकर यांनी जो संवेदनशील पण दाखवला त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
००००
