महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव; नागरिकाभिमुख व पारदर्शक प्रशासनावर भर
सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
महसूल विभाग हा शासन आणि जनतेमधील सर्वात महत्त्वाचा दुवा असून जन्मदाखल्यापासून ते शेतजमिनीच्या नोंदीपर्यंत नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी या विभागाचा थेट संबंध येतो. त्यामुळे महसूल यंत्रणेने केवळ प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडण्यापुरते मर्यादित न राहता जनतेचा विश्वास संपादन करत जिल्ह्याच्या विकासातही सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मायनाक भंडारी सभागृहात आयोजित ‘महसूल दिन’ कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महसूल दिनाच्या शुभेच्छा देताना पालकमंत्री राणे म्हणाले की, शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे, पारदर्शक प्रशासन राबविणे आणि नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देणे ही महसूल विभागाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. तळागाळातील नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने काम करावे. महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचा गौरव केल्याने त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळते आणि त्यांचे मनोबल वाढते, असेही त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल विभागाने विभागीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केली असून भविष्यात राज्यस्तरावरही उल्लेखनीय कामगिरी करून जिल्ह्याचा लौकिक वाढवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच महसूल विभागात पारदर्शकता वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे त्यांनी अभिनंदन केले.
यावेळी महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच महसूल कोकण विभाग स्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात नितीन नाईक, अंकिता आणावकर, रसिका सावंत आणि हेमलता राऊत यांना दिव्यांग पालकत्व प्रमाणपत्रांचे वितरणही करण्यात आले. महसूल दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमातून नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि कार्यक्षम प्रशासनासाठी महसूल विभागाने अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *