भूमिगत विद्युत वाहिनी आणि सी.सी टी.व्ही प्रकल्पामुळे मुरबाडच्या विकासाला नवी गती
राजीव चंदने
मुरबाड : मुरबाड नगरपंचायत क्षेत्राचा कायापालट करण्याच्या उद्देशाने माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना (शिंदे गट)मुरबाड तालुका प्रमुख, रामचंद्र दुधाळे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुरबाडकरांच्या दीर्घकालीन मागणीला मंजुरी देत १० कोटी रुपयांचा ऐतिहासिक निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे मुरबाड शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल होणार आहे. या निधीतून राबवल्या जाणाऱ्या दोन प्रमुख प्रकल्पांमुळे मुरबाडच्या चेहरा-मोहऱ्यात आमूलाग्र बदल होईल.
सद्यस्थितीत असलेली मुरबाड नगरपंचायत ते शिरवली जलकुंभपर्यंतची जीर्ण आणि ओव्हरहेड विद्युत वाहिनी पूर्णपणे भूमिगत करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे एकीकडे शहराचे सौंदर्य वाढेल तर दुसरीकडे पावसाळ्यात होणारे वीज खंडित, अपघात, आणि वीज, वाहिन्यांचे नुकसान याला पूर्णविराम मिळेल. नागरिकांना अखंड, सुरक्षित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळणे शक्य होईल. तसेच मुरबाड नगरपंचायत हद्दीतील सर्व प्रमुख चौक, बाजारपेठा, शाळा आणि गर्दीच्या ठिकाणी अत्याधुनिक सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारले जाणार आहे. या माध्यमातून शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होईल, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवता येईल आणि २४x७ केंद्रीय नियंत्रण कक्षातून शहरावर लक्ष ठेवता येईल.
या विकासकामांच्या मंजुरीमुळे मुरबाडकरांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. रामचंद्र दुधाळे यांच्या दूरदृष्टीमुळे आणि नेतृत्वामुळे मुरबाडच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळाली आहे. दुधाळे यांच्या प्रयत्नांमुळे शहराला हा निधी मिळाल्याबद्दल समस्त मुरबाडकरांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी नगराध्यक्ष रामचंद्र दुधाळे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
‘मुरबाडला स्मार्ट आणि सुरक्षित शहर बनवणे हे माझे स्वप्न आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या या निधीमुळे ते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. मुरबाडकरांच्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी मी कटिबद्ध आहे.’ असे वक्तव्य मुरबडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र दुधाळे यांनी व्यक्त केलं.
०००००
