मुंबई, दि. (प्रतिनिधी) : एकेकाळी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून पत्रकारितेत ठसा उमटवून नंतर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उतरलेले मंगेश चिवटे यांनी विधानपरिषदेत प्रवेश करण्याची जय्यत तयारी केली असल्याचे दिसून येते. पुणे शिक्षक मतदारसंघ शिवसेनेकडे यावा आणि या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वैद्यकीय कक्षाचे प्रमुख श्री मंगेश चिवटे हे विधानपरिषदेवर निवडून यावेत यासाठी स्वतः मंगेश चिवटे यांनी कंबर कसली आहे. त्यांच्या उमेदवारीसाठी सर्व मंत्री, आमदार ताकद लावणार अशा शब्दांत आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगून ते स्वतः मंगेश चिवटे यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला येथे आयोजित मंगेश चिवटे यांच्या प्रचार शुभारंभ सोहळ्यात बोलताना सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा देत महत्त्वपूर्ण विधान केले. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, “शिवसेना-भाजप यांच्यात जागावाटप होत असताना पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ हा शिवसेनेकडे यावा, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच मंगेश चिवटे यांना उमेदवारी मिळावी यासाठी शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार आणि पदाधिकारी पूर्ण ताकदीने प्रयत्न करतील.”
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले मंगेश चिवटे यांनी आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय व लोकाभिमुख कार्य उभे केले आहे. हजारो गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देणे, विविध आरोग्य उपक्रम राबविणे आणि समाजसेवेत सातत्याने सक्रिय राहणे, ही त्यांची मोठी ओळख आहे. याचबरोबर शिक्षकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवत विश्वासार्ह नेतृत्व निर्माण केले आहे. त्यामुळे शिक्षकांना न्याय देणारे सक्षम प्रतिनिधित्व म्हणून त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे.
यावेळी उपस्थित शिक्षकांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विधानाचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने काम करणाऱ्या मंगेश चिवटे यांच्या पाठीशी मोठ्या ताकदीने उभे राहण्याचा निर्धारही अनेकांनी व्यक्त केला. प्रचार शुभारंभ सोहळ्यास शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेमुळे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळात या वक्तव्याची विशेष चर्चा रंगली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *