काँग्रेस कार्यालयावर राष्ट्रवादीचा मोर्चा
हरिभाऊ लाखे
नाशिक: राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या(अजित पवार गट) अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचा उल्लेख समाजमाध्यमांवरील एका चित्रफितीत ‘गुंगी गुडिया’ असा करण्यात आल्याच्या निषेधार्थ बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर आंदोलकांनी काँग्रेस पक्ष कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. या राजकीय घडामोडींमुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील टीकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काँग्रेसविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी घोषणाबाजी करत आपला मोर्चा महात्मा गांधी रोडवरील काँग्रेस पक्ष कार्यालयाकडे वळवला. आंदोलनादरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.
या आंदोलनात आमदार सरोज अहिरे, जिल्हाध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुणे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक अध्यक्ष अंबादास खैरे, भगूर नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे, दिलीप खैरे यांच्यासह विविध पदाधिकारी सहभागी झाले होते. मोर्चा एम. जी. रोडवरून पुढे सरकत असताना पोलिसांनी बॅरिकेड्स उभारून आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळी बोलताना आमदार सरोज अहिरे म्हणाल्या, काँग्रेसने ज्या पद्धतीने सुनेत्रा पवार यांच्याविषयी अपशब्द वापरले, त्याचा आम्ही निषेध करतो. राज्यातील सर्व महिला सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवार यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली.
दरम्यान, आंदोलकांना रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. या गदारोळात आमदार अहिरे काँग्रेस पक्ष कार्यालयापर्यंत पोहोचल्या, तर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. वातावरण तणावपूर्ण होताच पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली. यावेळी सरकारवाडा आणि भद्रकाली पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोर्चाने राष्ट्रवादीचे हसू झाले…
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने काँग्रेस पक्ष कार्यालयावर मोर्चा काढून स्वतःचेच हसू करून घेतले आहे. त्यांनी आमच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याऐवजी नाशिककरांच्या प्रश्नांवर, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांवर आणि त्यात अनेक नागरिकांना गमवावे लागलेल्या जीवांच्या जबाबदारीचे भान ठेवून महानगरपालिकेवर मोर्चा काढला असता, तर त्यांचे हसू झाले नसते. त्यांना बुद्धी मिळो, हीच माफक अपेक्षा. — निलेश (बबलू) खैरे, अध्यक्ष, नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी, नाशिक
०००००
