रमेश औताडे
मुंबई : अदानी इलेक्ट्रिसिटी आस्थापनेतील ९०० पैकी तब्बल ४५० अधिकाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता, टप्प्याटप्प्याने कामावरून काढून टाकण्याचे कारस्थान कंपनीने रचल्याचा गंभीर आरोप अदानी इलेक्ट्रिसिटी ऑफिसर्स असोसिएशनचे सरचिटणीस प्रदीप बोरकर यांनी केला असून या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले.
कंपनीला प्रचंड आर्थिक लाभ मिळवून देऊनही कोणतीही दया-माया न दाखवता, आकस ठेवून अधिकाऱ्यांवर ही कारवाई १ सप्टेंबर पासून सुरू केली जात असल्याचा दावा असोसिएशनचे निशिकांत धवन यांनी केला. या दडपशाही आणि अन्यायकारक धोरणाविरोधात सरकार व जनतेचे लक्ष वेधण्यासाठी अधिकारी मैदानात आक्रमक झाले होते.
अदानी व्यवस्थापनाच्या या कारभाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अधिकाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर लाक्षणिक धरणे आंदोलन केले. सरकारने या प्रकरणी गंभीरपणे निर्णय घ्यावा अन्यथा मंत्रालयासमोर आंदोलन करू असा इशारा दिला.
