कल्याण : पारमिता धर्मादाय न्यास, कल्याण (प.) यांच्या वतीने शहापूर तालुक्यातील अंदाड येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष बालकदास मेश्राम, सचिव मधुसूदन राऊत, कोषाध्यक्ष अॅड. अनिल मेश्राम, विश्वस्त विश्वनाथ जांभूळकर, प्रो. डायरेक्टर सुनित धाणके तसेच सामाजिक कार्यकर्ते धर्मा गायकवाड, बोधाचार्य मनोज गायकवाड, मुख्याध्यापक प्रवीण शिर्के आणि शिक्षिका संगीता कांबळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी सचिव मधुसूदन राऊत यांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मोफत शालेय साहित्य वाटप, वैद्यकीय शिबिरे तसेच महिलांसाठी रोजगार व कौशल्य विकास प्रशिक्षण असे विविध उपक्रम संस्थेतर्फे सातत्याने राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि आई-वडिलांचा आदर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत मन लावून अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्ष बालकदास मेश्राम यांनी अंदाड येथील शाळेतील शैक्षणिक वातावरणाचे कौतुक केले. डिजिटल आणि विज्ञान विषयक साहित्याने शाळा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले. मुख्याध्यापक प्रवीण शिर्के यांनी सूत्रसंचालन केले. तसेच शालेय साहित्य वाटपाबद्दल पारमिता धर्मादाय न्यासाचे आभार मानले. यावेळी शिक्षक, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पालक प्रतिनिधी उपस्थित होते.
०००००००
