विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा व नगरसेविका परिषा सरनाईक आयोजित
अनिल ठाणेकर
ठाणे- विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा व नगरसेविका परिषा सरनाईक यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शनिवार, २९ ऑगस्टला श्रावण महिन्यानिमित्ताने लोकमान्य नगर, वर्तकनगर ते घोडबंदर परिसरातील महिलांसाठी भव्य मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी “मैत्री” या संकल्पनेवर आधारीत मंगळागौर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या या सामान्य महिला असून काही महिला ह्या बँकेत काम करतात, तर काही डॉक्टर आहेत, तर काही महिला या घरकाम करतात, धुणी-भांडी करतात, काही आदीवासी महिला आहेत ह्या सर्व महिलांनी स्पर्धेत भाग घेऊन “मैत्री” ही संकल्पना खूप सुंदररीत्या साकारली.
मंगळागौरच्या निमित्ताने “मैत्री” संकल्पना साकारत असताना प्रथम पारितोषिक मिळवणाऱ्यानी दुर्योधन-कर्ण यांची मैत्री दाखवली, तर काहींनी सुमद्र-कोळी यांची मैत्री, काहींनी गाठोड्यामध्ये सासू-सून, ननंद-भावजय यांची मैत्री दाखवली, काहींनी मुली-मुलींची मैत्री, काहींनी छत्रपती संभाजी महाराज व मावळे यांची मैत्री , काहींनी कृष्ण-सुदामा, काहींनी चंद्र-तारे यांची मैत्री दाखवली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, खासदार ज्योती वाघमारे, विधान परिषद आमदार एडवोकेट माधवी नाईक, प्रवक्ता व उपनेत्या शीतल म्हात्रे, महापौर शर्मिला पिंपळोलकर, अभिनेत्री नीलम शिर्के, मराठी अभिनेता सुरुध वार्डेकर, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका मंजू मंगल प्रभात लोढा, नगरसेविका विमल भोईर, जयश्री डेव्हिड, शीतल ढमाले, सुलेखा चव्हाण, एकता भोईर, निर्मला कणसे, मीनल संखे, जयश्री फाटक, पद्मा भगत, वर्षा शेलार, नंदा पाटील, नगरसेवक राकेश शिंदे तसेच भाईंदर जिल्हा संघटक निशा नार्वेकर, शहर संघटक पूजा आमगावकर तसेच मोठ्या संख्येने पुरुष व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विहंग चॅरिटेबल ट्रस्ट ची मंगळागौर ही स्पर्धा महाराष्ट्राची संस्कृती, पारंपारिक खेळ जपणारी तसेच स्थानिक महिलांच्या कलागुणाना वाव देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ आहेच, पण त्याचबरोबर प्रत्येक मंगळागौर मध्ये एक चांगला संदेश दिला जातो तसेच महिलांमध्ये होणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सर संदर्भात देखील जनजागृती केली जाते. त्याचप्रमाणे यावर्षी ड्रग्स, गुटखा पान या नशेच्या आहारी तरुण पिढी जात असल्याने त्यावर उपाय योजना करण्यासाठी शाळा, महाविद्यालय, प्रार्थनास्थळे यांच्या आजूबाजूला असलेल्या पानटपऱ्या, हातगाड्या हटविण्यासाठी अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री यांच्याकडे विनंती केली व मंगळागौर मध्ये आलेल्या नागरिकांमध्ये देखील जनजागृती केली. आपली मुले, नातवंडे शाळेत, महाविद्यालयात जात असतील त्यामुळे आजूबाजूला असलेल्या पानटपऱ्या, हातगाड्या हटविण्यासाठी आपणही पुढाकार घ्यावा.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका मंजू मंगल प्रभात लोढा यांनी कवितेच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन दिले व परिषा सरनाईक यांचे कौतुक केले. तसेच यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांची मंथन यांनी खास मुलाखत घेतली. मंगळागौर करीता परीक्षक म्हणून त्रुषाली फडळे, सायली शिंदे, प्रणोती पाटील आणि सुमित निषाद यांनी जबाबदारी पार पाडली.
