६९ किलो एमडी जप्त; २१ जणांना अटक
मिरा -भाईंदर : गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ च्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून सापळा रचून दोन इसमांना ताब्यात घेतले. याबाबत तुळींज पोलीस ठाणे गुन्हा नोंदवण्यात आला होता. यातुनच पुढे तपासातून आंतरराज्य रॅकेट उघड झाले. या गुन्ह्याचा सखोल तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-४ ने सुरू केला असता धक्कादायक माहिती समोर आली.
तपासात निष्पन्न झाले की जुमा ठाकूर यांच्या मालकीचे गाव – सांधाण, गुजरात येथील शेतजमिनीत M.D. तयार करण्याची अवैध फॅक्टरी सुरू होती.  ही फॅक्टरी निष्फळ करून अयान सय्यद (जालीम गँग सदस्य) याने M.D. तयार करण्यासाठी लागणारे लॅब साहित्य व केमिकल नेरळ, जि. रायगड येथे साठवून ठेवले होते. पोलिस कारवाईची कुणकुण लागताच जाहीद शेख ऊर्फ जावेद भाई याने सदर मुद्देमाल कल्याण येथे आणून नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पोलीस तपासात तो मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
तसेच, मोईनुद्दीन शेख याच्या मदतीने M.D. आणि अमली पदार्थाची विक्री जळगाव येथे केली जात असल्याचे निष्पन्न झाले. रहीम ताहेर भजियारी आणि सय्यद मुशाहिद अली यांना जळगाव, महाराष्ट्र येथून ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून ४ किलो ९११ ग्रॅम M.D. हस्तगत करण्यात आला.
रजनीश रामचंद्र मिश्रा आणि शिवम शंभूनाथ मिश्रा यांच्या ताब्यातून मिळालेल्या माहितीवरून प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे मुख्य M.D. ड्रग बनवण्याचा कारखाना असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शाखा कक्ष-४ च्या पथकाने प्रयागराज येथील एका शेतजमिनीच्या भाड्याच्या खोलीत तयार करण्यात आलेल्या कारखान्यावर छापा टाकून ५२ किलो ९३२ ग्रॅम M.D., M.D. तयार करण्यासाठी लागणारे २६० लिटर केमिकल (MMA, Acetone, Hydrochloric acid, Chloroform) व २५० आणि १५० लिटर क्षमतेचे प्लास्टिक ड्रम, हिटिंग मेंटल, ड्रॉपिंग फनेल, थर्मामीटर इत्यादी लॅब साहित्य जप्त केले.
या संपूर्ण कारवाईत आतापर्यंत एकूण ६९ किलो ७५९ ग्रॅम M.D., रोख रक्कम, M.D. तयार करण्यासाठी लागणारे २६० लिटर केमिकल व लॅब साहित्य असा एकूण सुमारे १३९ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात M.D. तयार करणारे, केमिकल व लॅब साहित्य पुरवणारे, पेडलर, आर्थिक व्यवहार करणारे असे एकूण २१ आरोपींना नालासोपारा, मुंबई (कुलाबा, आग्रीपाडा, मानखुर्द, कुर्ला), कल्याण, नेरळ-कर्जत, जळगाव, गुजरात आणि उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली आहे.या रॅकेटचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे तपासण्याचे काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *