छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आज मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा
नवी दिल्ली -खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के आणि कोकणातील इतर खासदारांच्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला होता. गुरुवार, ३ सप्टेंबर पासून ही एक्सप्रेस ट्रेन नियमित धावणार असून दुपारी १२.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तर ठाण्यात खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वात शिवसेना कोकणवासियांसमवेत ट्रेनचे जंगी स्वागत करणार आहेत. या नवीन ट्रेनमुळे गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची मोठी सोय होणार आहे.
‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेस सेवेला नुकतीच मंजुरी दिली. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के आणि कोकणातील खासदारांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश आले होते. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे ही नवीन ट्रेन उद्यापासून सुरु होत असल्याची प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुखमंत्री एकनाथ शिंदे, उपमुखमंत्री सुनेत्रा पवार यांचे कोकणवासींच्या वतीने खासदार नरेश म्हस्के यांनी आभार मानले आहेत.
कोकणातील जनतेची नवीन ट्रेन सुरू करण्याची सातत्याने मागणी होत होती. नवीन ट्रेन सुरू केल्याचा मी शब्द दिला होता. उद्यापासून नवीन ट्रेन सुरू होत असून आपली ही वचनपूर्ती असल्याची भावना खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे. तसेच ही एनडीए चे हे मोठे यश असल्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.
महाराष्ट्र आणि कोकण प्रदेशातील प्रवासी कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी, भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) आणि सावंतवाडी रोड दरम्यान ही दैनिक एक्सप्रेस ट्रेन सेवा सुरू करण्यात आली आहे. या नवीन सेवेमुळे ५१० किलोमीटरच्या मार्गावर थेट, सोयीस्कर आणि विश्वसनीय रेल्वे जोडणी उपलब्ध होईल. ज्यामुळे पर्यटन, शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि सामाजिक उद्देशांसाठी प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना फायदा होणार असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.
प्रस्तावित रेल्वेगाडी क्रमांक १५०८७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक १५०८८ सावंतवाडी रोड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस या नावांनी दररोज धावेल.
दैनिक एक्सप्रेसचे थांबे – दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, वालिवाडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड.
या मार्गामुळे मुंबई महानगर क्षेत्र आणि कोंकणातील प्रमुख शहरांमध्ये अखंड रेल्वे संपर्क निर्माण होणार आहे. पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. या नव्या सेवेचा मोठा फायदा कोंकण किनारपट्टीवरील पर्यटन स्थळांना होणार आहे. समुद्रकिनारे, किल्ले, मंदिरे आणि निसर्ग पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होईल. तसेच विद्यार्थी, व्यापारी, नोकरी करणारे आणि दैनंदिन प्रवाशांसाठीही ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. प्रादेशिक विकासाला गती या ट्रेनमुळे मिळणार असून कोंकण विभागातील आर्थिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. प्रवास सुलभ होऊन लोकांची ये-जा वाढेल आणि स्थानिक व्यवसायांना देखील फायदा होणार आहे. कोंकण मार्गावरील वाढती प्रवासी मागणी पूर्ण करण्यासाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. ही नवीन एक्सप्रेस सेवा रेल्वेच्या प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या आणि देशातील संतुलित प्रादेशिक विकास साधण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के म्हणाले.
0000
