८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व विशिष्ट दिव्यांगत्व असलेले
रायगड : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, विशिष्ट दिव्यांगत्व असलेले दिव्यांग मतदार तसेच कोविड आजाराने आजारी असलेले ३ हजार २९ मतदारांच्यासाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या गृह मतदान प्रक्रियेस आज पासून सुरुवात झाली असून ४ मे पर्यंत पथक गृहभेटी देणार आहे असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.
८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, विशिष्ट दिव्यांगत्व असलेले दिव्यांग मतदार तसेच विविध आजाराने पिडीत असलेल्या संबंधित मतदारांना नमुना १२ ड मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत वाटप करण्यात आलेले होते. प्राप्त नमुना १२ ड ची छाननी करून पात्र मतदारांसाठी गृहभेटी प्रसंगी मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यासाठी मतदान पथके गठित करण्यात आलेली असून सदर पथके पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सदर मतदारांच्या घरी भेट देतील. मतदानाची गोपनीयता राहावी या दृष्टीने सर्वतोपरी काळजी घेण्याच्या सूचना सर्व मतदान पथकांना देण्यात आलेल्या आहेत. नियमित मतदान केंद्राप्रमाणे मतदान कक्ष व इतर साहित्य मतदान पथकासोबत असेल. गृह भेटीवेळी विहित केलेल्या पद्धतीनुसार मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येऊन मतपत्रिका संकलित करून दर दिवशी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करण्यात येणार आहे. या पथकासोबत पुरेसा पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या सेवेतील एक अधिकारी सूक्ष्मनिरीक्षक म्हणून सदर पथकासोबत नियुक्त करण्यात आलेला आहे.
