मुंबई : उत्तर-मध्य मुंबईतील कालिना विधानसभा मतदारसंघात भाजपा नगरसेवक डॉ. नितेश राजहंस सिंह यांच्या वतीने वाकोल्यातील हनुमान मंदिर परिसरात भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यास गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उत्सवात विविध गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्यासाठी चुरशीची लढत दिली. गोविंदा पथकांनी तब्बल २५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांच्या बक्षिसांची लयलूट केली.
दहीहंडीच्या थरारासोबत ‘रंग महाराष्ट्राचा’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्सवात आणखी रंग भरला. महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला, परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या विविध सांस्कृतिक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. गोविंदा पथकांसह नागरिकांनीही या सांस्कृतिक कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. दहीहंडीचा थरार आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा जागर अशा दुहेरी रंगांनी वाकोल्यातील हनुमान मंदिर परिसर अक्षरशः दुमदुमून गेला. ‘रंग महाराष्ट्राचा’च्या सांस्कृतिक मेजवानीमुळे यंदाच्या दहीहंडी उत्सवाला विशेष आकर्षण प्राप्त झाले. या कार्यक्रमाला मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम, आमदार पराग अळवणी, आमदार राजहंस सिंह, सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडेकर, तसेच नगरसेविका हितल गाला, नगरसेवक सुषम सावंत, जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
०००००००००
