महिला गोविंदा पथकांना विशेष प्राधान्य; २०० हून अधिक पथकांचा सहभाग
कल्याण : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील मातोश्री गुंजाई चौक, संतोषनगर येथे शिवसेना व युवासेना कल्याण पूर्व यांच्या वतीने मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली भव्य दहीहंडी उत्साहात पार पडली. या उत्सवात २०० हून अधिक गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवत सलामी दिली, तर महिला गोविंदा पथकांना यंदा विशेष प्राधान्य देण्यात आले. सहभागी पथकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे परिसरात दिवसभर दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळाला.
दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून पारंपरिक गोविंदा संस्कृतीला प्रोत्साहन देतानाच महिला गोविंदा पथकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात आला. उत्सवासाठी २५ लाख रुपयांचे बक्षीस तसेच विविध आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली होती.
उत्सवस्थळी सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाचा आयोजक प्रमुख तथा शिवसेना संपर्कप्रमुख आणि विद्यमान नगरसेवक महेश गायकवाड, नगरसेवक कैलास जोशी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. युवासेना विधानसभा अध्यक्ष अजय गायकवाड यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आयोजकांनी उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या गोविंदा पथकांमुळे मातोश्री गुंजाई चौक परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
०००००००
