मुंबई : आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. प्रायोजित मुंबई महापौर चषक शालेय मुलामुलींची मोफत एकेरी कॅरम स्पर्धा २६ सप्टेंबरपासून आयोजित करण्यात आली आहे. दादर-पश्चिम येथील को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन सभागृहात ही स्पर्धा माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ व मुंबई महापौर रितू तावडे यांच्या सहकार्यामुळे विनाशुल्क होणार आहे.

पहिल्या मुंबई महापौर चषक शालेय कॅरम खेळाडूंच्या स्पर्धेस सन २०१८ मध्ये लाभलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर तांत्रिक अडचणीमुळे खंडित झालेली स्पर्धा पुन्हा आयोजित करण्यासाठी आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांना यंदा यश लाभले आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विध्याधर अनास्कर यांनी देखील प्रोत्साहन दिले आहे. शालेय खेळाडूंचा कॅरम खेळाकडे असलेला मोठा प्रतिसाद लक्षात घेऊन संयोजकांनी स्पर्धेच्या पूर्वतयारी अंतर्गत मोफत मार्गदर्शनात्मक सराव उपक्रमाची सुरुवात इच्छुक शाळांमध्ये ७ सप्टेंबरपासून केली आहे. सराव उपक्रमाचा प्रारंभ चेंबूर नाका मनपा शाळेपासून होत आहे.

एमएससी बँक-मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धा २६ व २७ सप्टेंबर रोजी रंगणार असून इयत्ता दहावी पर्यंतच्या १६ वर्षाखालील शालेय मुला-मुलींसाठी विनाशुल्क खुली आहे. स्पर्धेतील पहिल्या १६ विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक पुरस्कार दिले जाणार आहेत. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या शालेय कॅरम खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण (९८६९३ ५७७६३) अथवा प्रमोद पार्टे (९८६९० ६५२३९), को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन मुंबई कार्यालय, स्टेट बँकेच्या बाजूला, भवानी शंकर रोड, दादर-पश्चिम, मुंबई ४०० ०२८ येथे १० सप्टेंबरपर्यंत दररोज सायं.६ ते ८.३० वा. संपर्क साधावा.

००००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *